महाराष्ट्र

Mahayuti 2.0 : गृहमंत्री म्हणून तेच का पुन्हा येणार?

BJP : देवेंद्र फडणवीस ठेवणार स्वतःकडे खातं 

Maharashtra Government : महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. परंतु यंदा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी ‘नहले पे दहेला’ मारण्याचा प्रयत्न केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यात प्रिय असलेले गृह खातं शिवसेनेने मागितलं आहे. हे खात भारतीय जनता पार्टी आणि स्वतः देवेंद्र फडणवीस कधीच ‘कॉम्प्रमाईज’ करणार नाहीत. असं काय विशेष आहे या खात्यात ज्यामुळे फडणवीस नेहमीच ‘गेम चेंजर’ ठरतात, हे जाणून घेणे तितकच महत्त्वाचं आहे.

मुख्यमंत्री हे जरी राज्य सरकारचे प्रमुख असले तरी गृहमंत्री पद ज्याच्याकडे असते, अशा मंत्र्याजवळ नेहमीच हुकूमाचा एक्का असतो. मुख्यमंत्र्यांपेक्षाही पोलीस विभाग गृहमंत्र्यांच्या संरक्षणासाठी दिवस-रात्र राबवत असतो. घरामध्ये ‘होम मिनिस्टर’ म्हणून बायकोचं राज्य असते. राजकारणात खऱ्या अर्थाने ‘होम मिनिस्टर’ महत्त्वाचे असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यात काय सुरू आहे याची पूर्ण माहिती गृहमंत्र्यांना असते. राज्याचे पोलीस महासंचालक, अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था, गृह विभागाचे सचिव, सीआयडीचे प्रमुख आणि राज्य गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख (SID) यांची दररोज सकाळी गृहमंत्र्यांसोबत बैठक होत असते.

खडानखडा माहिती 

राज्याचे गृहमंत्री थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या संपर्कात असतात. बरेचदा गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांच्याही संपर्कात असतात. राज्यातील सर्व मंत्र्यांना व्हीआयपी सुरक्षा प्रदान केली जाते. याशिवाय अन्य महत्त्वाच्या व्यक्तींना देखील अशी सुरक्षा असते. नियमानुसार ज्या व्यक्तींना सुरक्षा पुरवली जाते त्यांच्या हालचालींची माहिती संबंधित जिल्ह्याच्या, विभागाच्या आणि राज्याच्या पोलिस नियंत्रण कक्षाला देणे बंधनकारक असते. त्यामुळे राज्याच्या कोणत्या रस्त्यावर कोणता मंत्री कुठे ‘मुव्हमेंट’ करत आहे, याची माहिती गृह विभागाला अर्थातच गृहमंत्र्यांना असते.

Congress : ‘नाना पटोले हटाव’ मोहिम जोरात!

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गृहमंत्री हे जबाबदार असतात. त्यामुळे कुणाला कधी आत टाकायचं आणि कोणाला कधी बाहेर काढायचं, याचा निर्णय एक प्रकारे गृहमंत्री घेत असतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार महाराष्ट्रामध्ये असताना तेव्हाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पद काय असते हे समजावून सांगितलं. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल जरी गृहमंत्रालय तयार करीत असलं तरी अंतिम स्वाक्षरीसाठी ही फाईल मुख्यमंत्र्यांकडेच जाते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच स्वतःकडे गृहमंत्री पद ठेवलं पाहिजे, असं त्यावेळी आर. आर. पाटील बोलून गेले होते.

आर. आर. पाटील यांनी ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्र्यांची ताकद समजावून सांगितली त्यावेळी नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. हा किस्सा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी काही पत्रकारांना सांगितला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस ज्यावेळी प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी गृहमंत्री पद स्वतःकडे ठेवलं. त्यानंतर त्यांना या पदाची ‘हिडन पॉवर’ लक्षात आली. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र आणि राज्याच्या पोलिस दलात आपलं ‘नेटवर्क’ प्रचंड मजबूत केलं. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांना पदोपदी हालचालींची माहिती मिळत होती.

पोलीस आणि गृह विभागामध्ये अनेक ‘खबरी’ फडणवीसांना माहिती पुरवायचे, ही बाब काही खोटी नाही. महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचीच भूमिका महत्त्वाची होती. शिवसेनेचे तब्बल 40 मंत्री आणि आमदार गुवाहाटीला निघून गेले. यापैकी अनेकांना झेड दर्जाची सुरक्षा होती. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडीचे तेव्हाचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना देखील अशी सुरक्षा होती की, त्यांच्या ‘मुव्हमेंट’ची माहिती राज्य पोलीस नियंत्रण कक्षाला असणे अपेक्षित होते. परंतु असे काहीही घडले नाही. एकनाथ शिंदे यांच्यासह सगळेजण जेव्हा गुवाहाटीला पोहोचले त्यावेळी महाराष्ट्रात मोठा बॉम्ब पडला.

Vidarbha Farmers in trouble : सोयाबीन, कापूस अन् अपघात!

साहेबही नाराज 

शिवसेनेमध्ये ज्यावेळी फूट पडली त्यावेळी दिलीप वळसे पाटील हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कारागृहात गेले होते. त्यामुळे दिलीप वळसे पाटील नुकतेच पदावर आले होते. नेमकी हीच संधी साधत भाजपने आपला गेम साधला. पोलीस दलात फेरबदल सुरू होते. त्यामुळे जुने अधिकारी जाऊन नवे अधिकारी येत होते. हे अधिकारी सेट होण्यापूर्वीच भाजप शिवसेनेचे सगळे ‘बाण’ भात्यात घातले आणि फुटीची प्रत्यंच्या अशी काही ओढली की, सगळ्यांना धक्का बसला.

सगळ्यात पहिला धक्का बसला तो शरद पवार यांना. त्याचे कारण म्हणजे शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे सुरक्षेचे सगळे ‘प्रोटोकॉल’ काय असतात हे त्यांना ठाऊक होते? या सर्व ‘प्रोटोकॉल’ला चकमा देत 40 मंत्री आणि आमदार फुटलेच कसे याचा धक्का त्यांना बसला. महाराष्ट्रातून गुवाहाटीला म्हणजे एका राज्याच्या सीमेतून दुसऱ्या राज्याच्या सीमेत जाईपर्यंत व्हीव्हीआयपी मंत्र्यांची मुव्हमेंट राज्य गुप्तवार्ता विभाग, सीआयडी किंवा सुरक्षेसाठी तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न खुद्द पवारांनी वळसे पाटलांना विचारला.

ठाकरे साहेब सैरभैर 

दुसरा बॉम्ब फुटला तो ‘मातोश्री’वर. शरद पवार यांनी गंमतच मुख्यमंत्रीपदावर बसवलेल्या उद्धव ठाकरे यांना आपल्या खुर्ची खालील चारही पाय काढून नेले आणि आपल्याला कळले कसे नाही, याचं आश्चर्य वाटलं. 2024 मधील निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘माझा महाराष्ट्र माझ्यासोबत असं कसं करू शकतो’, हे त्यांचे शब्द होते. त्यामुळे सगळा ‘गेम’ लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने राजीनामा दिला.

ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्याबद्दल प्रतिक्रियाही व्यक्त केली होती. उद्धव ठाकरे हे परिपक्व राजकारणी (Matured Politician) असं ठामपणे शरद पवार म्हणाले. सुप्रीम कोर्टानेही सुनावणी उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिल्याचे नमूद केले. त्यामुळे ज्या व्यक्तीने स्वतःहून पद सोडलं त्याला परत बोलावणं शक्य नसतं असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळी सांगितलं. महायुतीचा सरकार सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक वेळ मुख्यमंत्रीपद ‘कॉम्प्रमाईज’ केलं. पण गृहमंत्री पद मात्र स्वतःकडे ठेवलं. त्यामुळे महाराष्ट्राच्या या चाणक्याला आर. आर. पाटील यांनी त्यावेळी दिलेला कानमंत्र आता कामी पडला आहे.

नाही.. नाही.. नाही..

काही वर्षांपूर्वी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी नाही.. नाही.. नाही.. असं म्हणत अजित पवार यांच्यासोबत खुर्ची ‘शेअर’ करणार नाही, असं ठामपणे सांगितलं होतं. पण राजकारणात कोणी कोणाचा फार काय शत्रू किंवा मित्र नसतो. उद्धव ठाकरे यांचा धनुष्य जसा फडणवीस यांनी तोडला, तसाच पवारांचा देखील योग्य वेळी ‘घड्याळी’चे काटे फिरवून ‘करेक्ट गेम’ करायचा होता. एकदा का पवारांची पावर संपली की, महाविकास आघाडी खिळखिळी होईल, हे भाजप आणि फडणवीस यांना चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे फडणवीसांचे नाही.. नाही.. कधी हो.. हो.. मध्ये बदलले याची कल्पना पवारांनाही आली नाही. हे सर्व शक्य झालं ते गृह विभागाच्या भरवशावरच. त्यामुळेच काहीही झालं तरी भाजप आणि स्वतः फडणवीस गृहमंत्री पद दुसऱ्याला देणार नाही.. नाही.. नाही.. या पदावर फडणवीसच पुन्हा येणार.. पुन्हा येणार.. पुन्हा येणार..

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!