Buldhana Constituency : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे नरेंद्र मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. त्यामुळे ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे’, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले. बुलढाणा येथे शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र यासाठी मोठा आहे, कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेत. त्यामुळे या महाराष्ट्राला मोठा इतिहास आहे. आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. ते गुजरातचे राज्यकर्ते नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. त्यामुळे ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात, असे राऊत म्हणाले. राऊत यांनी हे वक्तव्य करताच कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने ‘मोदी आला मोदी’ अशी हाक आली. यावर मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, असे राऊत म्हणाले आहे.
शिवाजी महाराजांचा उल्लेख
खासदार संजय राऊत यांनी नमूद केले की, हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे, महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आहे आणि बाजूच्या राज्यात औरंगजेब जन्माला आला. पण जे-जे या महाराट्रावर चाल करून आले, ज्यांनी ज्यांनी या महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, ते औरंगजेब, शाहिस्ता खान, अफजल खान अशा सर्वांना याच मातीत गाडण्याचे काम इतिहासात झाले आहे. त्यामुळे आताही त्या विचाराने कोणी महाराष्ट्रावर हल्ले करणार असतील तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने स्थापन झालेली शिवसेना आहे. त्या शिवसेनेचे निर्माते बाळासाहेब ठाकरे आहेत. तीच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे. त्यामुळे अशा औरंगजेबांना नेस्तनाबूत करण्याचे काम केले जाई.
राऊत म्हणाले, याद राखा, महाराष्ट्रावर चाल करून येण्याचा प्रयत्न करू नका. हा महाराष्ट्र संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. शिवसेनेवर हल्ला केला. शिवसेनेचे दोन तुकडे केले, ते यासाठी केले कारण त्यांना या महाराष्ट्रात स्वाभिमानी मराठी माणसाला संपवायचे आहे. हा महाराष्ट्र विकायचा आहे. मुंबई विकायची आहे. उद्योगपतींच्या घशात घालायची आहे. मात्र हे होणार नाही. जोवर शिवसेना आहे, तोपर्यंत शिवरायांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न शिवसेना पुढे घेऊन जाईल. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तोडण्यासाठी आधी शिवससेना तोडली पाहीजे, मग महाराष्ट्र तोडू मग मुंबई तोडू अशा प्रकारचे कारस्थान या दिल्ली आणि गुजरातच्या लोकांनी केले आहे. त्यांना तोंड देऊन संघर्ष करू\ त्यांना मागे हटवायचे आहे, असेही राऊत म्हणाले.