Maharashtra Politics : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता शिवसेनेकडून राज्यात ‘लाडकी बहिण कुटुंब भेट’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात शिवसेनेचे 50 हजार कार्यकर्ते 1 कोटी महिलांना भेटून संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी गुरूवारी (ता. ५). बाळासाहेब भवन येथे दिली.
या अभियानासंदर्भात माहिती देताना निरुपम म्हणाले की, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लाडकी बहिण कुटुंब भेट’ अभियानाचा शुभारंभ होणार आहे. राज्यातील 70 ते 80 विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघांत प्रत्येक कार्यकर्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असे हमीपत्र घेऊन 10 लाडक्या बहिणींच्या घरी पोहोचणार आहे.
60 लाख बहिणीपर्यंत पोहोचणारा
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान तयार करण्यात आले आहे. निरुपम पुढे म्हणाले की, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी शिवसेना कार्यकर्ते लाडक्या बहिणींच्या घरी जातील. दररोज किमान 5 लाख आणि महिनाभरात 60 लाख लाडक्या बहिणींच्या घरी या अभियानातून संपर्क साधला जाईल. या अभियानात सर्वच कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये विशेष ॲपचा समावेश असेल. या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग असून कार्यकर्त्याने केलेला संपर्क, तिथं दिलेला वेळ समजेल.
Electric vehicle : महाराष्ट्र होणार इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचे केंद्र !
लाडक्या बहिणींचा योजनेबाबतचा अनुभव आणि सूचनांची नोंद केली जाईल. गरज पडल्यास ॲपमधून नाव नोंदणीदेखील केली जाईल. दरम्यान, बदलापूर घटनेचे राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर निरुपम यांनी कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, बलात्कार आणि जिवे मारण्याचा गुन्हा असलेल्या कल्याणमधील साईनाथ तरे या माजी नगरसेवकाला पक्षात घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना सुरक्षित बहिण योजना आठवली नाही का?
शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या गुन्हेगार तरेला पक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांना काय संदेश द्यायचा आहे, असा सवाल निरुपम यांनी केला. सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांना आमंत्रण देण्यात आलेले नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या षडयंत्राने उबाठाला सांगलीतून हद्दपार केले. लवकरच उबाठा महाराष्ट्रातून हद्दपार होईल, अशी टीका निरुपम यांनी केली. महाविकास आघाडी ही मतभेद विकास आघाडी बनली असून निवडणूक जवळ येताच आघाडी फुटेल, असा दावाही त्यांनी केला.