महाराष्ट्र

Assembly Election : बाळापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना.

Balapur Constituency : आमदार नितीन देशमुख यांना टक्कर देण्यासाठी शिंदे गटाची खेळी

New Strategy : आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी सर्वत्र पाहायला मिळत आहे. अकोल्यातील बाळापूर मतदारसंघात सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नितीन देशमुख हे आमदार आहेत. या मतदारसंघात आमदार देशमुख यांना आव्हान देण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गट मोठी खेळी खेळण्याची शक्यता आहे. या मतदारसंघावर शिवसेना एकनाथ शिंदे गट दावा करीत आहे. बाळापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत एकनाथ शिंदे गटाला सुटला, तर या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगण्याची शक्यता आहे. 

उद्धव ठाकरेंना पाठिंबा

आमदार नितिन देशमुख हे तेच आमदार आहेत, जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्ष फुटीनंतर सूरतला गेले होते. गुवाहाटी येथे जात असताना त्यांनी पलायन केले. परत येत त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. त्यानंतर देशमुख यांनी एकनाथ शिंदे व भाजपवर गंभीर आरोप केले होते. आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असेही देशमुख म्हणाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना शिवसेने भूकंप झाला होता.

शिंदे यांचे बंड

एकनाथ शिंदे यांनी बंड करीत शिवसेनेतील 40 आमदार सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अल्पमतात असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या घडामोडीत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहिले. त्यामुळे आता देशमुख यांचा राजकीय गेम करण्यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने बाळापूर विधानसभा मतदारसंघात व्यूहरचना केली आहे. शिवसेनेकडून महायुतीत बाळापूर मतदारसंघावर दावा केला जात आहे. शिवसेनेतील अनेक इच्छुक या मतदारसंघातून पुढे येत आहेत. आमदार देशमुख यांना आव्हान देण्यासाठी रणनीती आखली जात आहे.

महाविकास आघाडीत बाळापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेचे नितीन देशमुख पुन्हा या मतदारसंघातून प्रबळ दावेदार आहेत. देशमुख मतदारसंघात बैठकसत्र घेत आहेत. त्यांच्या दौऱ्यांना वेग आला आहे. देशमुख यांना तगडे आव्हान देण्यासाठी शिंदे गटाचे इच्छुकही तयारीला लागले आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया हे प्रमुख दावेदार आहेत. जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप यांचेही नाव आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले व आता शिवसेनेत आलेले रामेश्वर पवळही इच्छुक आहेत. महायुतीत ऐनवेळी हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येतो, याची उत्सुकता आहे.

Assembly Election : बाळापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना.

कोणाला मिळणार जागा

बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही सरसावला आहे. या गटाकडूनही बाळापूरवर दावा केला जात आहे. राष्ट्रवादीतूनही अनेक जण इच्छुक आहेत. बाळापूर मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णयक आहेत. आतापर्यंत काँग्रेसने या मतदारसंघावर राज्य केले आहे. महाविकास आघाडीत आल्यानंतर शिवसेना बाळापूर मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार आहे. मात्र काँग्रेसकडूनही बाळापूर मतदारसंघावर दावा केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतही बाळापूरची जागा कोणाला मिळणार, याची उत्सुकता आहे.

error: Content is protected !!