Political News : बुलढाण्याचे गद्दार खासदार प्रतापराव जाधव यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी भाजपच्या तिकीटावर लोकसभा लढणार नाही हे जाहीर करावे, असे खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. आता ठाकरे यांनी पुन्हा सिंदखेडराजातून पुन्हा जाधव यांना डिपॉझिट जप्त करून दाखवतोच असे जाहीर ‘चॅलेंज’ दिले आहे. ठाकरेंच्या टीकेला खासदार प्रतापराव जाधव यांनी लगेच प्रत्युत्तर देत संजय राऊत नाही, तर आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) आपल्या विरोधात उभे करा असे सांगितले.
लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीतही जोरदार हालचाली सुरू आहे. एकीकडे महायुतीने 48 पैकी 45 जागा जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे, तर महाविकास आघाडीसमोर विरोधकांची मोट बांधत महायुतीला धक्का देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावत आहे. अशात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुलढाणा जिल्हाच्या दौर्यावर आलेत. त्यांनी सिंदखेडराजा व मेहकर येथे जनसंवाद यात्रा सभा घेतली. या सभांमधून त्यांनी शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झालेले खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेनेत असलेल्या प्रतापराव जाधव यांनी आमदारकी आणि खासदारकी दोन्हींची ‘हॅट्ट्रिक’ केली आहे.
नरेंद्र खेडेकर यांना संधी?
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगलाच दबदबा राहिला आहे. जाधव हे शिवसेनेतील मातब्बर नेत्यांपैकी एक आहेत. बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले अन् कडवा शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे प्रतापरावांनी बंडाच्यावेळी ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ करत थेट शिंदेंना साथ दिली. आता त्याच जाधवांविरोधात ठाकरे आपला उमेदवार देणार आहेत. शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांविरोधात नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत ठाकरेंनी या आधी दिले होते. खेडेकरांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा ठाकरे बुलढाणा दौऱ्यात करतील असे वाटत असताना त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही.
जाधवांना घेतले आडव्या हातांनी
खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, इथला गद्दार त्याला तरी काय करायचे ? आपण किती वेळा त्याला खासदार करायचे? जे मिठाला जागत नाहीत. असा गद्दार पुन्हा डोक्यावर घेणार का? ही गद्दारी केवळ माझ्याशी नाही. मी काय नव्हते दिले. आमदार केले, नंतर शिवसेना प्रमुखांनी खासदार केले. तरीही जाधव इमानाला जागले नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली. बुलढाणा काय तुमच्या सातबारावरती लिहिलेला नाही, की बुलढाणा मतदारसंघ म्हटला की कोणी निवडणुकीत उभाच राहणार नाही. कोणी जिंकणारच नाही. यावेळेला टक्कर माझ्याशी आहे. तुमचे ‘डिपॉझिट’ जप्तच करून दाखवितो, असे आव्हानच ठाकरे यांनी जाधव यांना दिले.
प्रतापरावांचा पलटवार
उद्धव ठाकरेंच्या टीकेला खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत नाही तर आदित्य ठाकरे यांना माझ्या विरोधात बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उभे करा असे प्रतिआव्हान जाधव यांनी ठाकरेंना दिले. हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी आपाल्या विरोधात बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, असे आव्हान यापूर्वी जाधव यांनी ठाकरे यांना दिले होते. आता पुढची लोकसभा निवडणूक शिवसेनेतूनच लढणार आहे, असे आव्हानही जाधवांनी दिले होते.