Maharashtra Assembly Election : लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी (ता. सात) छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला. त्यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचा जाहीर मेळावा पार पडला. या मेळाव्यात त्यांनी पुढील तीन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीचा बिगुल वाजविण्यात आला.कालची लढाई देशाचे संविधान (Constitution Of India) वाचविण्यासाठी होती. आता विधानसभेची निवडणूक येणार आहे. ही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणुकीत (Lok SAbha) ठाकरे गटाचे उमदेवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. हा पराभव उद्धव ठाकरे यांना चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यांनी संभाजीनगरच्या पराभवाचा मुद्दा उपस्थित करीत काही प्रश्न केले.काय झालं कसं झालं? याचा विचार केला गेलाच पाहिजे. आता तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होत आहेत. कालची लढाई होती ती आपल्या देशाची, संविधानाची लढाई होती. विधानसभेची निवडणूक येणार आहे. ही महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई असेल. या महाराष्ट्राची ओळख जगामध्ये काय लिहिली गेली पाहिजे? ते ठरवणारी ही निवडणूक आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
भावनिक साद
महाराष्ट्र हा साधूसंतांचा, शिवप्रभूंचा, मर्दांचा अशी राज्याची ओळख आहे. ही ओळख अशीच ठेवणार की, लाचार, गद्दार आणि हरामखोरांचा महाराष्ट्र अशी ओळख होऊ देणार? हे आपण ठरवा. मी तर म्हणेण, मी लाचारी, गद्दारी आणि हरामखोरांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही. प्राणपणाने लढेन. पण माझ्या शिवरायांच्या भगव्याला कलंक लागू देणार नाही, ही शपथ घेऊन मी मैदानात उतरलो आहे, असं ठाकरे यांनी नमूद केले. विधिमंडळाच्या अधिवेशनाला (Legislative Monsoon Session) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मी म्हटले होते की, हे गळती सरकार आहे. या गळती सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे. हे शेवटचं अधिवेशन आहे.
निवडणूक जवळ आल्यानंतर हे जुमलेबाज सरकार पुन्हा गादीवर दिसणार नाही, अशी शपथ घेऊन आपण मैदानात उतरलो पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
योजना खूप मांडल्या जात आहेत. खास करुन माता-भगिनींना आपल्याकडे आकर्षित कसं केलं जाईल, यासाठी ते डाव आखून ते मतदान आणि निवडणुकीला सामोरं जात आहेत. योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे.
सरकारच्या पापाचा बुरखा फाटला आहे. मशाल घेऊन किती पापं जाळणार? योजनांच्या पांघरुणाखाली या सरकारला लपायचं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती करुन दाखवली होती. कदाचित तो माझा मूर्खपणा असेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.