Shiv Sankalp Mela : अमित शाह यांना संघाचे हिंदूत्व मान्य आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे हिंदूत्व कोणते आहे, असा प्रश्न शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. पुण्यात आयोजित शिवसंकल्प मेळाव्यात ते बोलत होते. अमित शाह हे अहमदशाह अब्दालींचे राजकीय वंशज आहेत. ते पुण्यात येऊन गेले. भाषण करून गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. मी ढेकणाला आव्हान देत नाही, असेही ठाकरे म्हणाले.
आमचे हिंदूत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदूत्व आहे. साधु संतांचे, महाराष्ट्राला पुढे नेणारे आमचे हिंदुत्व आहे. आम्ही त्याच्याशी कधीही तडजोड केलेली नाही. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या सभेत बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहिल. माझ्या पायाशी कलिंगड ठेवलेले होते. त्यामुळे काही जणांना वाटले की मी त्यांना आव्हान दिले. मी कोणत्याही ढेकणाला आव्हान देत नाही. मी म्हणजे माझा संस्कारी महाराष्ट्र आहे. तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोरांचा पक्ष आहे. ढेकणाला कधीही आव्हान दिले जात नाही. ढेकूण चिरडायचा असतो, असे ठाकरे म्हणाले.
स्वत:वर घेतले आव्हान
मी केवळ बोललो पण काही जणांनी माझे आव्हान स्वत:वर घेतले. माझ्या नादाला लागू नका असे ते म्हणाले. मी म्हणतो तुमच्या नादाला लागण्याइतकी किमतीचे तुम्ही नाहीतच, असे ठाकरे म्हणाले. गद्दारांनी चोरबाजार मांडला आहे. पुणे आणि मुंबईला लुटले जात आहे. कंत्राटदारांच्या मदतीने पैसा कमावला जात आहे. अनधिकृत मार्गाने कमावला जाणारा हाच पैसा निवडणुकीत वापरला जाणार आहे. शिवेसना भाकड जनता पार्टी नाही. शिवसेना म्हणजे मशाल आहे. शिवसेना निखारा आहे. पक्षाची जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी सोपविली आहे, असेही ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील जनता न्यायाधीश आहे. आम्ही जनतेच्या न्यायालयात लढा देणार आहोत. त्यामुळे मतदार आता निर्णय करतील असेही ठाकरे म्हणाले. मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाच्या बेगमने त्याला विचारले होते जहाँपना तुम्हाला काय मिळवायचे आहे? तेव्हा औरंगजेबाने त्याच्या बेगमला महाराष्ट्र काबीज करणार असे म्हटले होते. संपूर्ण देश काबीज करून मी शांतपणे जगायला सुरुवात करेल असे तो म्हणाला होता. त्याच्या आयुष्यात निवांतपणा आला नाही. अखेर त्याची कबर येथेच बनली. अगदी त्याच प्रकारे भाजपची कबर इथेच खोदली जाणार आहे.