या लेखातील मते ही लेखकांची आहेत. ‘द लोकहित’ या मतांशी सहमत असेलच असेल नाही.
Shiv Sena : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आता विरोधकात असूर आणि दैत्य दिसू लागले आहेत. या विरोधकांचा संहार आणि नि:प्पात करण्यासाठी त्यांनी आता चक्क आई जगदंबेला साकडे घातले आहे. पक्षातर्फे एक गोंधळगीत लिहून घेण्यात आले आहे. या गीताचे अनावरण नवरात्रोत्सवाच्या प्रथम दिवशी करण्यात आले.
‘असुरांचा सहार कराया ,मशाल हाती दे’ अशा ओळी या गोंधळ गीतात आहेत. श्रीरंग गोडबोले यांनी हे गीत लिहिले आहे. राहुल रानडे यांनी संगीत दिले आहे. नंदेश उमप यांनी आपल्या पहाडी आवाजात हे गोंधळगीत गायले आहे. असूर, दैत्य आणि भ्रष्टाचारी रूपात असलेल्या आपल्या विरोधकांना पराभूत करण्यासाठी कानोकांनी हे गोंधळ गीत पोहोचवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
सत्वर भूवरी ये ग अंबे , तू सत्वर भूवरी ये..
असुरांचा संहार कराया, मशाल हाती दे…
दृष्ट मातले फार तयांचे , मर्दन करण्या तू ये..
अत्याचारी दैत्यापासून अभय अम्हाला दे…
पाप वाढले घोर, जाळण्या मशाल हाती दे..
सत्वर भूवरी ये ग अंबे, सत्वर भूवरी ये..
अशा ओळी गाण्याच्या सुरुवातीला आहेत. सध्या देशभरात महिला अत्याचारावरून मोठे वादळ उठले आहे. त्यावरही शिवसेनेच्या गितात उल्लेख करण्यात आला आहे.
स्त्रीची अब्रू लुटणारे, ते दैत्य माजले आता.
माय भगिनींना कुणी न उरला वाचवणारा त्राता..
असे नमूद करीत महायुती ( Mahayuti) सरकारवर टीका करण्यात आली आहे. अशा गोंधळगीतांतून आपला पक्ष विरोधकांशी दोन हात करायला सज्ज झाला आहे, हे सांगण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून करण्यात आला आहे. माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत. त्यांच्या हाती मशाल दे. भ्रष्टाचार अराजक जाळून भस्म कर, असे साकडे या गीताच्या माध्यमातून घातल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
जनतेच्या कोर्टात
शिवसेना गेली अडीच वर्षे न्याय मंदिराची दारे ठोठावत आहे. आमचे हात दुखायला लागले आहेत. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. पण अजूनही न्याय मिळत नाही. शेवटी आम्ही जगदंबेला साकडे घातले आहे की, आता तू तरी दार उघड. शिवसेना आता जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.महाराष्ट्रात तोतयेगिरी चालली आहे. भ्रष्टाचाराचे थैमान माजले आहे. या परिस्थितीतून वाचवणारा कोणी त्राता दिसत नाही.जगदंबेच्या हाक मारल्यावर, ती धावून येते, अनेकांना असाअनुभव आला आहे. आई भवानी आपले स्वत्व दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.शिवसेनेच्या दसरा मेळाव्याविषयी अनेकांना उत्सुकता असते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असताना या मेळाव्याला खूप महत्त्व होते. बाळासाहेबांचे भाषण ऐकायला प्रचंडी गर्दी व्हायची. आता हा मेळावा फक्त विरोधकांवर टीका करण्यासाठी होतो. कोणतीही ठोस भूमिका मांडली जात नाही. लवकरच शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. तिथे आपण ‘सौ सोनार की, एक लोहार की’ या तत्वाने हिशेब करून टाकू, असे उध्दव ठाकरे म्हणाले.
सर्व विषयांवर बोलणार
आता ज्यांना जे काही बोलायचे आहे ते बोलू द्या. आपण सर्व विषयांवर बोलू, असे नमूद ठाकरे यांनी विरोधकांवर टीका करणाऱ्यांना इशारा दिला. त्यामुळे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) अनुषंगाने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडे शत्रू म्हणून बघितले जात आहे. आता तर त्यांना दैत्य आणि असूर असे बोधले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांचेवर बरेचदा बोचरी टिका केली आहे. ‘औरंगजेब फॅन क्लब’चे सदस्य म्हणून शाहांनी ठाकरेंचा डिवचले आहे. त्यामुळे सहाजिकच उद्धव ठाकरे अमित शाह यांच्यावर टीका करतात.
महाराष्ट्रात त्यांचा सर्वाधिक राग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जबरदस्त धक्का दिला. महाविकास आघाडीच्या डोळ्यादेखत 40 आमदार घेऊन शिंदे निघून गेले. यापैकी अनेक मंत्री होते. त्यांना व्हीव्हीआयपी सुरक्षा होती. 24 तास सुरक्षेच्या गराड्यात राहणारे मंत्री फुटण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत कोणालाही कळले नाही, हा ठाकरेंसाठी प्रचंड मोठा धक्का होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील या धक्क्यामुळे जमिनीवर आपटले. अनिल देशमुख जेलमध्ये असल्याने दिलीप वळसे पाटील हे गृहमंत्री होते. त्यामुळे एवढ्या मोठ्या बंडखोरीची माहिती गृहमंत्र्यांनाही कळली नाही.
पवारांचा प्रश्न
राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याच्या ‘मुव्हमेंट’ची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला असते. मात्र नाकाखालून 40 आमदार, मंत्री निघून गेले तरी पोलिस, गुप्तचर यंत्रणा काय करीत होती, असा जवाब पवारांनी विचारला. काही केल्या खुर्ची वाचणार नाही, हे ठाकरेंना लक्षात आले होते. परंतु त्यांनी शस्त्रं टाकून दिली. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही देऊन टाकला. सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court Of India) ठाकरे यांनी स्वखुशीने राजीनमा दिला. त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करू शकत नाही, असा निर्णय दिला. शरद पवारांनी तर ठाकरे हे अपरिपक्व असल्याचे नमूद केले. त्यांनी राजीनामा देण्यासाठी घाई केली, असं पवार म्हणाले. मात्र आता पुन्हा पवार, ठाकरे आणि काँग्रेस ताकदीने सोबत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) मिळालेल्या यशाने त्यांचे मनोबल उंचावले आहे. मात्र शिवसेनेचे हे गोंधळ गीत पाहता, अचानक मुख्यमंत्रिपद गमवावे लागल्याची खंत अजूनही ठाकरेंना वाटत असल्याचं दिसतं.