रायगडावर आयोजित होणारा शिवराज्यभिषेक सोहळा यापुढे दरवर्षी शासकीय निधीतून होणार आहे. राज्यशासनाने ही जबाबदारी स्वीकारली असून यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आठ दिवसापूर्वी रायगडावरून केली होती. शुक्रवारी (ता. 28) अंतरिम अर्थसंकल्पात त्यासाठी निधी मंजूर झाला. यामुळे जगभरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवराज्यभिषेकाबाबत जो निर्णय शुक्रवारी झाला, त्याचे खरे श्रेय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून मुनगंटीवार यांनी जणू काही स्वत:ला शिवसेवेत समर्पित केल्याचे दिसून येत आहे.
अफजल खानाच्या कबरीभोवती अतिक्रमणाचा विळखा वाढला होता. खानाचे उदात्तीकरण सुरू झाले होते. कबर ज्या ठिकाणी होती, तो परिसर मुनगंटीवार यांच्या विभागाच्या कार्यक्षेत्रात येत होता. त्यामुळे मुनगंटीवार यांनी धाडसी निर्णय घेतला. कबरीच्या परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे येथे त्यांच्याच नावाचा जयजयकार मान्य केला जाईल. कुण्या खानाचे उदात्तीकरण सहन करणार नाही, असा थेट संदेशच मुनगंटीवार यांनी या मोहिमेतून दिला.
राज्यभर जयजयकार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाले. हा सोहळा सुधीर मुनगंटीवार यांनी न भूतो न भविष्यती कसा करून दाखविला. शिवाजी महाराजांचा मावळा अशा अर्थाने त्यांनी शिवसेवा कायम ठेवली. ज्या अफजल खानाच्या कबरी भोवतीचे अतिक्रमण मुनगंटीवार यांनी पाडले, त्याच अफजल खानाच्या वधासाठी महाराजांची वापरलेली वाघनखं परत आणलीच पाहिजे असा चंग त्यांनी बांधला. बस्स झालं ना मग. एकदा मुनगंटीवारांच्या मनात एखादी गोष्ट आली की, ती झालीच म्हणून समजा असे त्यांच्याबाबत बोलले जाते. मुनगंटीवार तातडीने कामाला लागले. वाघनखं स्वराज्यात आणण्यासाठी त्यांनी लंडनमध्ये सामंजस्य करार केला. लवकरच ही वाघनखं महाराष्ट्रात येतील.
काश्मीरातील पुतळा
मी पुणेकर या सेवाभावी संस्थेच्या मदतीने मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत भारत-पाक सीमेवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित होते. देशाच्या सीमावर्ती भागात महाराजांच्या या पुतळ्यातील तलवारीची पात शत्रुकडे रोखलेली आहे. त्यामुळे प्रसंगी पाकिस्तानलाही धडकी भरेल असे मुनगंटीवार पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी म्हणाले. रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शासकीय निधीतून झाला पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. याची त्यांनी घोषणा केली होती. अतिशयोक्ती नाही, पण मुनगंटीवार यांनी दिलेला शब्द म्हणजे ‘पत्थर की लकीर’ होती है, असे अनेक राजकीय नेते सांगतात. अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी याबाबत केलेल्या घोषणेने या दाव्यावर शिक्कामोर्तब झाले.
Sudhir Mungantiwar : कल्याणकारी संकल्पना साकार करणारा अर्थसंकल्प
आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर अनेक पक्षांनी राजकारण केले. मतांचा जोगवा मागितला. पण आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारला ते सुचले नाही, जे सुधीर मुनगंटीवार यांनी करून दाखविले असेच म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील चेलेचपाटे सध्या आनंदाने उड्या मारत आहेत. परंतु आपल्याच सत्ताकाळात अफजल खानाची कबर फुलांनी सजविली जात होती, याचा त्यापैकी अनेकांना विसर पडला. हा तोच अफजल खान होता तो शिवाजी महाराजांवर चाल करून आला होता. तो जीवंत राहिला असता तर स्वराज्यातील माताभगिनी, तरूणांवर कोणते संकट कोसळले असते याची कल्पना न केलेलीच बरी. त्याच अफजल खानाचे उदात्तीकरण रोखण्याचे काम मुनगंटीवार यांनी हिंमतीने करून दाखविले.
महायुतीची सत्ता आल्यापासून मुनगंटीवार एखाद्या सच्च्या मावळ्याप्रमाणे महाराजांची सेवा करताना दिसत आहेत. त्यातून जगभरातील शिवप्रेमी आनंदित आहेत. त्यांचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी ज्यावेळी वीजबिल माफीची घोषणा झाली, त्यावेळी विधानसभेत छत्रपतींच्याच नावाचा जयघोष आमदारांनी केला. अशात मुनगंटीवार छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींसाठी जे काही करीत आहे, ते पाहता कदाचित महाराज जिथुन कुठून त्यांना पाहात असतील तरच एकच म्हणत असतील.. व्वा.. खरच मला तुमचा अभिमान वाटतो !