Sarpanch Reinstated : सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार झाल्याने पालोराचे सरपंच शिशुपाल रामटेके अपात्र ठरले होते. त्यांना पदावर पूर्ववत कायम ठेवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
पवनी तालुक्यातील ग्रामपंचायत पालोरा येथे 2022 मध्ये निवडणुकीत शिशुपाल रामटेके सरपंच म्हणून निवडून आले. दरम्यान,पराभूत उमेदवार अंबादास धारगावे यांनी शिशुपाल रामटेके यांच्या विरोधात सरकारी जागेवर घर बांधून अतिक्रमण केल्याची तक्रार केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अधिनियम 1958 चे कलम 14 (1) ज नुसार रामटेके यांना अपात्र ठरविले होते.
सरपंच रामटेके यांनी गावातील मोखारा रस्त्याला लागून कृषी विभागाच्या गट क्रमांक 666 जवळील सन 1988-89 या कालावधीतील नकाशाप्रमाणे 30 बाय 50 फूट जागेवर सिमेंटचे कॉलम उभे केले. आणि टिनाचे शेड टाकून शासकीय जागा काबीज केली होती. त्यासाठी त्यांनी सन 2012-13 मध्ये दोन हजार रुपये दंड चालानद्वारा शासनाकडे जमा केला.
अंबादास धारगावे यांची तक्रार
अंबादास धारगावे यांनी 3 जानेवारी 2023 रोजी जिल्हा न्यायदंडाधिकारी भंडारा यांच्याकडे पुरावे सादर करून वकीला मार्फत बाजू मांडली. सरपंचांनी शासकिय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा न्यायदंडाधिकारी भंडारा यांनी पालोरा (चौरास) येथील सरपंच शिशुपाल रामटेके यांनी अपात्र घोषित केले.
रामटेके यांचे अपील
रामटेके यांनी कलम 16 (2) नुसार अप्पर आयुक्त नागपूर यांच्याकडे अपिल केले. त्यात अप्पर आयुक्तांनी सखोल चौकशी करून त्यांना पुन्हा पदावर कायम करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अंबादास धारगावे यांनी पुन्हा मुंबई हायकोर्टात अपिल केली. नागपूर खंडपीठाने शुक्रवारी ( 3 मे) दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून शिशुपाल रामटेके यांचे अतिक्रमण सिद्ध होत नसल्याने त्यांना सरपंच पदावर कायम ठेवण्याचा आदेश दिला.