Congress : आता महाराष्ट्राचा विचार करावाच लागेल. महाराष्ट्राच्या परिवर्तनासाठी लोकांमध्ये जाऊन जागृती करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांना शेवटी स्थान दिले. त्यामुळे सत्ता चुकीच्या हातात गेल्याने काय होते, हे दिसत आहे. देशावरील संकट पूर्णपणे टळलं नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात आज, शुक्रवारी (ता. 16) महाविकास आघाडीचा निर्धार मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, विरोधी पक्षनेत्याची प्रतिष्ठाही महत्वाची आहे. काल राहुल गांधींना शेवटच्या जागेवर बसवलं होतं. हे पूर्णतः चुकीचं आहे. उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे? आणि महाराष्ट्रावर जे संकट आहे, त्यातून सुटका कशी करता येईल. यासाठी आज प्रत्येक वक्त्याने राज्यात परिवर्तन करण्यासाठी काय काय केले पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न केला.
संविधानाची भूमिका मांडली
लोकसभेच्या निवडणुकीत आपण संविधानाची भूमिका मांडली. त्या निवडणुकीत काही प्रमाणात यश मिळालं. याचा अर्थ संविधानावरील संकट पूर्णपणे टळलं. हा निषिकर्ष काढता येत नाही. हल्लीच राज्यसभा लोकसभेचे अधिवेशन झाले. त्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक दिवसही सदनामध्ये आले नाही. त्यांना सदनाची प्रतिष्ठा आणि त्याचं महत्व दिसत नाही. ही स्थिती आम्हाला बघायला मिळाली. सत्ता चुकीच्या हातांमध्ये गेली की, काय होतं, याचे हे उदाहरण आहे, असे पवार म्हणाले.
प्रधानमंत्र्यांची प्रतिष्ठा देशाने ठेवली पाहिजे. तसेच विरोधी पक्ष नेत्याचीही प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. विरोधी पक्षनेते पाचव्या रांगेत बसले होते. हे योग्य नाही. मला आठवतं, मनमोहन सिंह प्रधानमंत्री होते. सुषमा स्वराज विरोधी पक्षनेत्या होत्या. याच 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात सुषमा स्वराज अग्रक्रमावर बसल्या होत्या. प्रतिष्ठा त्या व्यक्तीची नाही, तर त्या पदाची असते. ही जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. पण आता असे लोक सत्तेवर आहेत की, त्यांच्याकडून अपेक्षा करणे गैर आहे.
परिवर्तनाचा विचार
विधानसभा निवडणुकीला तीन महिने आहेत, असे सांगितले जात आहेत. ती नाही तर दोनच महिने शिल्लक आहेत. सामान्य लोकांमध्ये जाऊन जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार रुजवला पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातातील सत्ता काढणे, ही आपली जबाबदारी आहे. एकट्याने किंवा काही लोकांनी निदर्शने केली, तर त्यांना शिक्षा करण्याची तरतूद नवीन कायद्यामध्ये केली आहे. मुलभूत अधिकार उद्धवस्त करण्याचा कायदा राज्यकर्त्यांनी केला आहे.
सध्या तात्पुरता हा कायदा थांबवलेला असला तरी सत्तेचा गैरवापर होतो आहे, हे नक्की. यातून महाराष्ट्राची सुटका करून घेण्याचे आव्हान आज आपल्या सर्वांसमोर आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्र राहून सकारात्मक चित्र महाराष्ट्राला दाखवावे लागेल. आम्हा सर्वांकडून हे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.