Buldhana constituency : महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, खासदार संजय राऊत, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांच्या उपस्थितीत खामगाव येथे जाहीर सभा होणार आहे. 21 एप्रिल रोजी महाविकास आघाडीतील दिग्गज नेते पुन्हा एका मंचावर येणार असल्याने त्यादृष्टीने जय्यत तयारी केली जात आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या 21 एप्रिल रोजी पुन्हा बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे, खा.संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा जिल्ह्यात झालेल्या आहेत. मात्र आता महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षाचे नेते एका मंचावर येणार आहेत. त्यांची तोफ खामगावात भाषणाच्या माध्यमातून धडाडणार आहे.
उद्धव ठाकरे उमेदवार जाहीर होण्यापूर्वी चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे जनसंवाद मेळाव्यासाठी आले होते. उद्या खामगावातील जे.व्ही.मेहता महाविद्यालयाच्या खुल्या मैदानात सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे अखिल भारतीय सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत एका व्यासपीठावर येत असल्याने मतदारांना उत्सुकता आहे. ही सभा ऐतिहासिक होणार असल्याची चिन्हं आहेत. तरी खामगाव परिसरात उन्हाचा पारा काल 42 अंशापर्यंत पोहोचला असल्याने त्याचा फटका या जाहीर सभेवर होणार असल्याचे दिसून येते.
2019 मध्ये काय झालं?
2019 साली बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक लढवली, तर महायुतीकडून प्रतापराव जाधव रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीकडून माजी आमदार बळीराम शिरस्कार मैदानात होते. या निवडणुकीत जिल्ह्यातील सिंचन, कर्जमाफी, पीक विम्याचे न मिळालेलं पैसे, रोजगार, रखडलेला जालना -खामगाव रेल्वेमार्ग हे मुद्दे गाजले.पण, नरेंद्र मोदी हेच एनडीएप्रणित आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यामुळे त्याचा लाभ प्रतापराव जाधव यांना झाला आणि मोदी लाटेत ते विजयी झाले होते.