मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीवरही प्रभावी ठरणार, हे स्पष्ट झाले आहे. या आंदोलनाचा मोठा फटका लोकसभेत बसला आणि आताही बसू शकतो, याची पूर्ण जाणीव महायुतीला आहे. अश्यात मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला आंदोलक आणि महाविकास आघाडीतील इतर नेते आलेच नव्हते. आता शरद पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव ठेवला आहे. मात्र मनोज जरांगे यांनी असल्या कुठल्याही बैठकीला आपण जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी दीर्घ चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणाचाच मुद्दा चर्चेला होता. तोडगा काढण्याच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे दोघांनीही सांगितले. याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक देखील बोलावली होती. पण त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण शरद पवार यांनी नव्याने दिलेल्या प्रस्तावावरही मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे.
मराठा समाजाचे काही कार्यकर्ते शरद पवारांच्या भेटीला गेले होते. या भेटीनंतर पवारांनी मुख्यमंत्र्यांकडून आंदोलकांसह सर्वपक्षीय बैठकीची अपेक्षा व्यक्त केली. ‘50 टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही, हे न्यायालयाने आधीच स्पष्ट केले आहे. पण तरीही सरकारने पुढाकार घेऊन सर्वांना एकत्र घेऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला हवा. केंद्र सरकार आपल्या अधिकारात नक्कीच याचा विचार करू शकते. असे झाल्यास आम्ही सरकारसोबत आहोत,’ असे शरद पवारांनी म्हटले.
हा तर निवडणुकीचा डाव
मनोज जरांगे यांनी बैठकीचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. निवडणुका जवळ आहेत म्हणून सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येत आहेत. आजवर एवढी सरकारं झालीत पण कुणीही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. आता आंदोलनाची तीव्रता बघून यांचे धाबे दणाणले आहेत. आणि दोघे मिळून षडयंत्र रचालया लागले आहेत. त्यामुळे आम्ही बैठकीला येणार नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.
Mahavikas Aghadi Vs Mahayuti : महाविकास आघाडीने डागली महायुतीवर तोफ
हाच उत्तम उपाय
शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठक हाच उत्तम उपाय असल्याचे म्हटले आहे. राज्यातील वातावरण चांगले ठेवायचे असेल तर सर्वपक्षीय चर्चा करून तोडगा काढावा लागेल. त्यासाठी प्रत्येकाला जबाबदारीने वागावे लागेल. सर्वपक्षीय बैठक घेऊन मुख्यमंत्री मार्ग काढू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीनंतर शरद पवारांवर मोठी टीका झाली होती. शरद पवार केवळ चर्चा करतात पण भूमिका घेत नाहीत, असे आरोप त्यांच्यावर झाले होते.
मुख्यमंत्री म्हणाले आम्ही तयार आहोत
यापूर्वी बैठक घेतली तेव्हा ते लोक आले नाहीत. पण आम्ही आशावादी आहोत. आम्हाला महाराष्ट्रात चांगलं वातावरण ठेवायचं आहे. सर्वपक्षीय बैठक घ्यायला आम्ही तयार आहोत. दोन समाजांमध्ये कटुता राहू नये यासाठीच आमचा प्रयत्न आहे. शरद पवारांची भेट झाली तेव्हा त्यांच्याशी देखील याच विषयावर चर्चा झाली होती. आता देखील बैठकीची पूर्ण तयारी आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे.