महाराष्ट्र

Sharad Pawar : विश्वासू सहकाऱ्यासाठी येणार नागपूरला

NCP : दोन दिवसांचा राहणार मुक्काम 

Assembly Election : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या विश्वासू सहकाऱ्यासाठी दोन दिवस नागपुरात राहणार आहेत. अडचणीच्या काळात या नेत्याने साथ न सोडल्याने त्याची परतफेड आता शरद पवार हे करणार आहेत. माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी शरद पवार हे नागपूरमध्ये येत आहेत. गुरुवारी (7 नोव्हेंबर) पवार हे विदर्भात पोहोचतील. 

चर्चा करणार

नागपुरात दाखल झाल्यानंतर शरद पवार हे महाविकास आघाडी मधील नेत्यांची चर्चा करणार आहे. त्यानंतर ते काटोल मतदारसंघात जातील. या मतदारसंघातून अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख हे विधानसभा निवडणूक लढत आहेत. खरंतर सलील यांच्या प्रचारासाठीच शरद पवार नागपूरमध्ये येत असल्याचं सांगण्यात येत आहे. काटोल मतदारसंघात सलील देशमुख यांचा विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्यामुळे शरद पवार हे देखील या मतदारसंघात जोर लावणार आहेत.

प्रामाणिकपणाचे बक्षीस 

महाविकास आघाडीत गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या लाचखोरीचे आरोप झाले होते. त्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत देशमुख हे तुरुंगात होते. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलण्यासाठी आपल्यावर दबावाचा वापर करण्यात आला. आपल्याला वेगवेगळ्या पदांचं अमिष दाखवण्यात आलं. आमिषाला बळी न पडल्याने आपल्याला छळण्यात आलं. त्यानंतरही आपण शरद पवार यांची साथ सोडली नाही, असं अनिल देशमुख आजही सांगतात. आपल्याला अडकवण्यामागे देवेंद्र फडणवीस यांनी कटकारस्थान केलं असा त्यांचा आरोप आहे.

देशमुख यांच्या या आरोपांनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले. मात्र या संपूर्ण घटनाक्रमात अनिल देशमुख हे आपल्याशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ त्यांना शरद पवार यांनी दिले आहे. अनिल देशमुख हे जरी निवडणूक लढत नसले तरी त्यांचा मुलगा सलील यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सलील देशमुख यांना मानाचं स्थान मिळू शकते. त्यामुळे सलील यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वच नेते कामाला लागले आहेत.

Assembly Election : राज्यभरामध्ये 30 अब्जांवर रकमेची उलाढाल

जबाबदारी..

सलील देशमुख हे आतापर्यंत नागपूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय होते. अनिल देशमुख कारागृहात गेल्यानंतर काटोल मतदारसंघात त्यांनी यशस्वीपणे राष्ट्रवादीची कमान सांभाळली. सलील देशमुख हे काटोल मतदारसंघातून निवडणूक लढणार की त्यांना दुसरा मतदारसंघ मिळणार याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना जनतेच्या दरबारात उभे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी ही राष्ट्रवादी काँग्रेसने जबाबदारी स्वीकारली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!