Akhil Bharatiya Marathi sahitya Sammelan : व्यासपीठ कुठलेही असो, शरद पवार यांच्या नावाला पहिली पसंती असते. कुठल्याही पक्षाच्या पुढाऱ्याचा सत्कार असो, पुस्तकाचे प्रकाशन असो किंवा साहित्य संमेलन असो शरद पवार व्यासपीठावर असलेच पाहिजे, असा आग्रह असतो. त्यातल्या त्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि शरद पवार हे तर फार जुनं समीकरण आहे. यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवारांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची अत्यंत खराब कामगिरी राहिली. त्यामुळे शरद पवारांचे राजकारण संपल्याची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली. मात्र, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मात्र शरद पवारांचाच बोलबाला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होणार आहे. 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीतील तालकटोरा मैदानावर संमेलन होत आहे. पुण्याची सरहद्द संस्था संमेलनाचे यजमानपद भूषवत आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून शरद पवारांची अनेकदा उपस्थिती राहिली आहे. याशिवाय कधी त्यांची मुलाखत रंगली आहे, तर कधी समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहिले आहेत. विशेषतः पुण्यात कुठलेही मोठे साहित्य संमनेलन झाले तरीही त्यात शरद पवारांचा व्यासपीठावर सहभाग असतोच. मात्र, देशाच्या राजधानीत होत असलेल्या संमेलनामध्ये शरद पवार स्वागताध्यक्ष असणार आहेत. स्वागताध्यक्ष हा यजमानांचाच एक भाग असतो.
शरद पवार दीर्घकाळ केंद्रात मंत्री राहिलेले आहेत. त्यांचा देशातील राजकारणावर मोठा प्रभाव राहिलेला आहे. अशात दिल्लीत संमेलन होत असताना त्यांच्याएवढा मोठा मराठी माणूस स्वागताध्यक्ष म्हणून सापडणे अशक्य आहे, असे आयोजकांना वाटले असावे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये शरद पवारांच्या संदर्भातील या बातमीने काही काळ का होईना त्यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला असेल.
तर उद्घाटक कोण असेल?
शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता संमेलनाचा स्वागताध्यक्ष असेल तर संमेलनाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते होईल, याची उत्सुकता लागलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्घाटक म्हणून बोलावण्याची दाट शक्यता आहे. गडकरी आणि पवार यांचं नातं राजकारणाच्या पलीकडचं आहे. शिवाय पवार आणि गडकरी या दोन मराठी नेत्यांची राज्यात खूप लोकप्रियता आहे. त्यामुळे पवार स्वागताध्यक्ष आणि गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन असा योग आयोजक साधू शकतात.