Sharad Pawar : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती. शहराच्या मध्यवर्ती भागातील श्री ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह. श्रोत्यांनी खचाखच भरलेल्या या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वांची जाहीर माफी मागितली. सुमारे पाच वर्षांपूर्वी आपल्याकडून मोठी चूक झाली. या चुकीसाठी आपण अमरावतीच्या जनतेची क्षमा याचना करीत असल्याची शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या राजकारणात आपली कारकीर्द गाजवणाऱ्या पवारांनी जनतेची माफी मागितल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. पवारांनी जनतेची माफी मागण्याचे कारण म्हणजे अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलेला पाठिंबा. नवनीत राणा या गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावेळेस निवडणुकीमध्ये नवनीत राणा यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीत विजय झाल्यानंतर नवनीत राणा या भाजपच्या वाटेवर गेल्या. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले. सुमारे पाच वर्षांपूर्वी आपण नवनीत राणा यांना पाठिंबा दिल्याची खंत आपल्याला वाटते, शरद पवार म्हणाले.
माझ्या शब्दावर खासदार केले
मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला. मी सांगितलेल्या व्यक्तीला खासदार केले. पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. अमरावतीकरांना आमच्याकडून चूक झाली हे सांगवे असे मला वाटत होते. आता ती चूक पुन्हा कधी होणार नाही, असे पावर म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र
देशाची सत्ता गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. गेल्या 56 वर्षांत अनेकांना मी जवळून पाहिले. आजचे पंतप्रधान कुठेही गेल्यानंतर पहिल्यांदा नेहरू, काँग्रेसवर टीका करतात. दहा वर्षांत त्यांनी स्वतः काय केले याबद्दल कधीच बोलत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या हातून सत्ता काढून घ्यावीच लागेल. आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपली भूमिका मांडत आहेत. देशाच्या संविधानावर संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संविधानाचे रक्षण करावे लागेल, असे पवार म्हणाले.
महिला मुख्यमंत्री व्हावा
शरद पवार यांच्या भाषणाला सुरुवात होण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात एक आगळीवेगळी मागणी समोर आली. राज्यामध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेपासून अनेकांनी सत्ता उपभोगली. परंतु आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळाव, अशी मागणी शरद पवार यांच्यापुढे करण्यात आली.