महाराष्ट्र

Narendra Modi in Ramtek : आजकाल शरद पवारसुद्धा मला शिव्या देणाऱ्यांच्या रांगेत बसले…

Nagpur Lok Sabha Constituency : एक देश - एक संविधान काँग्रेसने देशात कधीही लागू होऊ दिला नाही

Nagpur : नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी आणि रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे पार पडली. या सभेत मोदींनी काँग्रेस नेत्यांवर जहरी टिका केली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नाही सोडले. त्यांच्यावरही मोदींनी शरसंधान साधले. 

मोदी म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात ६०० कोटी रुपयांची डाळ एमएसपीवर खरेदी करण्यात आली होती. तेव्हा कृषी मंत्री कोण होते, हे तुम्हाला माहिती आहेच. पण आमच्या सरकारने त्यांच्यासारखी कामे नाही केली, तर देशातील शेतकऱ्यांचा आधी विचार केला आणि सव्वालाख कोटी रुपयांची डाळ आम्ही दिली, असे म्हणत त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता टोला लगावला. येवढ्यावरच मोदी थांबले नाहीत, तर आजकाल ते सुद्धा मला शिव्या देणाऱ्यांच्या रांगेत जाऊन बसले, अशी टीका त्यांनी केली.

एक देश – एक संविधान काँग्रेसने देशात कधीही लागू होऊ दिला नाही. त्यांनी त्यांच्या सरकारच्या काळात संविधान देशभर लागू करण्याची हिंमत का नाही दाखवली? ७० वर्षांपर्यंत संविधान संपूर्ण देशात लागू नव्हते झाले. मोदीने काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत संविधान लागू करून दाखवले. काँग्रेस सरकारने काश्मीरमध्ये ३७० कलम तसेच ठेवले होते. त्यावेळी जम्मू-काश्मीरचे संविधान वेगळे होते आणि उर्वरीत देशात वेगळे संविधान होते. जेव्हा आम्ही म्हटले की, ३७० कलम हटवायचे, तर म्हणाले की काश्मीरमध्ये आग लागेल. लागली का कुठे आग, असा प्रश्न मोदींनी विचारला.

काश्मीरमधून ३७० कलम हटवल्यानंतर बाबासाहेबांचा आत्मा आज मोदी आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देत असेल. काँग्रेस नागरिकता देणारा कायदा सीएएचाही विरोध करत आहे. कारण या कायद्याचे लाभार्थी दलित बांधव आहे. ते कितीही विरोध करो प्रत्येकाला नागरिकता मिळेलच आणि ती आमचे सरकार मिळवून देईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी आणि सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रात्रंदिवस काम करीत आहेत, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारच्या कामाचे कौतुक केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!