Akola Constituency : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी काँग्रेस नेते साजिद खान पठाण यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल झाला आहे. फरार असलेल्या साजिद खानने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे साजिद खान याच्या अडचणी आता वाढल्या आहेत. कोणत्याही क्षणी साजिद खानला पोलिस अटक करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजिद खान यांनी मौलाना हाफीज नजीर यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना शिवीगाळ केली. माजी खासदार वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरले. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गजानन गवई यांच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या काँग्रेसचे नेते साजिद खानने जमिनासाठी प्रयत्न सुरू केले. त्याने अकोला येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी 17 मे रोजी अर्ज केला. यादिवशी न्यायालयाने साजिद खान यांचा तात्पुरता अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर हा अर्ज निकाली न काढता 20 मे सुनावणीची तारीख ठेवली होती. 20 मे रोजी पोलिसांचा ‘से’ न आल्याने 24 मे ही तारीख देण्यात आली. पोलिसांनी आपला ‘से’ दाखल केला.
काय आहे ‘से’मध्ये
पोलिसांनी ‘से’ मध्ये साजिद खान याच्यावरील विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्याची माहीती न्यायालयाला दिली. साजिद खानची कृती दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहे, असे पोलिसांचे न्यायालयात म्हणणे होते. त्यामुळे सुनावणी 28 मे रोजी ठेवण्यात आली. 28 मे रोजी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही पक्षांनी केलेला युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपी साजिद खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. फिर्यादीच्यावतीने दाखल केलेल्या वकील पत्रावर 50 पेक्षा जास्त वकिलांच्या स्वाक्षऱ्या होत्या. यावेळी फिर्यादी वकिलांनी साजिद खान याच्यावर दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्याची यादीच न्यायालयात सादर केली.
अटक शक्य
डाबकी रोड पोलिस ठाण्यात वंचितकडून देण्यात आलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून साजिद खान फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आता सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्याने साजिद खान याला कधीही अटक होऊ शकते. आधीच वंचित बहुजन आघाडीकडून साजिद खानला अटक करण्याची मागणी झाली आहे. आता साजिद अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी हायकोर्टात अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी साजिद खानला अटक करण्याची मागणी वंचितकडून होत आहे.