Mahayauti : सुमारे 547 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भंडाऱ्यातील दिग्गज नेत्यांनी दांडी मारली आहे. यातील बहुसंख्य नेते महायुतीमधील घटक पक्षातील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भंडाऱ्यात आठ विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. दुपारच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्ह्यात दाखल झालेत. खात रोडवरील माधव नगरात असलेल्या रेल्वे मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत हाते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेले, खासदार प्रशात पडोळे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजित वंजारी, आमदार नाना पटोले, आमदार नाना भोंडेकर यांचेही नाव होते. आमदार राजू कारेमोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिभकाटे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु यापैकी अनेक नेत्यांनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने हा शासकीय कार्यक्रम शिवसेनेचा मेळावा ठरला.
हे आहेत दांडीबाज
भंडारा-गोंदियातील हेवीवेट नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या नेत्यांमध्ये सगळ्यात पहिले होते. याशिवाय आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित कार्यक्रमाला आलेच नाही. उद्योग मंत्री उदय सामंत यांनाही कार्यक्रमासाठी वेळ काढता आला नाही. आमदार नाना पटोले, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यानंतरही आमदार राजू कारेमोरे यांनाही कार्यक्रमस्थळी येण्याची गरज वाटली नाही.
MSEDCL : ‘स्मार्ट मीटर’च्या नादात पडला खऱ्या मुद्द्याचा विसर
विकास कामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा राजकीय नव्हता. हा कार्यक्रम शासकीय होता. त्यामुळे जनहिताच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते. विरोधी पक्षातील असले तरी नेत्यांना यावेळी मुख्यमंत्र्यांपुढे संबंधित भागातील समस्यांचा पाढा वाचता आला असता. परंतु बोटावर मोजण्याइतक्याच नेत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यातही शिंदे समर्थकांची संख्या जास्त होती. त्यामुळे हा कार्यक्रम शासकीय नव्हे तर शिंदे गटाचा ठरला. शासकीय कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींनी मारलेल्या दांडीमुळे उपस्थितांमध्ये याची चर्चा होती.
राजकारणच महत्वाचे
अनेक लोकप्रतिनिधींनी कार्यक्रमाला दांडी मारल्याने नेत्यांनी लोकहितापेक्षा पक्षाच्या राजकारणालाच महत्व दिल्याचा संदेश यातून गेला. मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी आले तेव्हापासूनच ते घाईत होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यक्रम सुरू करण्याची सूचना केली. त्यामुळे त्यांना अशी कोणती घाई होती, याचा प्रश्न अनेकांना पडला. मुख्यमंत्री भंडाऱ्यात असल्यामुळे त्यांनी मोठी घोषणा जिल्ह्यासाठी करावी, अशी अपेक्षाही अनेक नेत्यांची होती.