Central Ministry : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचं खातेवाटप 10 जून सोमवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे. या खातेवाटपात 30 केंद्रीय मंत्र्यांसाठीचं खातेवाटप, 5 राज्यमंत्र्यांना स्वतंत्र प्रभार तर 20 राज्यमंत्र्यांसाठी विविध खात्यांचं वाटप करण्यात आलं आहे. या खातेवाटपात महाराष्ट्राच्या वाटेला नेमकं काय येतं? याबाबतची उत्सुकता होती. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 खासदारांची निवड झाली आहे. यापैकी खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाप्रणित एनडीएला बहुमत मिळालं. त्यानंतर रविवारी (9 जून) राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि मित्रपक्षांच्या 71 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. या नव्या मंत्र्यांना आता खातेवाटप जाहीर करण्यात आलं असून, यात महत्त्वाची खाती भाजपानं आपल्याकडेच ठेवल्याचं दिसून येतंय. मोदींच्या नेतृत्वाखालील या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय.
रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी वर्णी लागली. त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचं राज्यमंत्रिपद देण्यात आले असून या खात्यामार्फत खडसे आता राज्यातील युवकांचं कल्याण करणार आहेत.
महाराष्ट्राकडे याआधीचे मंत्रिपद
रक्षा खडसेंच्या रूपाने खान्देश म्हणजेच उत्तर महाराष्ट्राला तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपद मिळत आहे. याआधी काँग्रेसचे खासदार विजय नवल यांना केंद्रीय दूरसंचार खातं मिळालं होतं. त्यानंतर 1999 साली अटलबिहारी सरकारमध्ये एरंडोलचे तत्कालीन आमदार एम के पाटील यांना राज्यमंत्रिपद मिळालं होतं. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात गेल्या दोन्ही टर्म्समध्ये धुळे येथून निवडून गेलेल्या सुभाष भामरेंना राज्यमंत्रिपद मिळाले होते.
राज्यातून कोणाला कोणतं खातं
नितीन गडकरी : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री. पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री. रक्षा खडसे : केंद्रीय राज्यमंत्री, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. प्रतापराव जाधव : केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. मुरलीधर मोहोळ : केंद्रीय राज्यमंत्री, सहकार मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय.रामदास आठवले : केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय.