Akola district : जिल्ह्यात कपाशीच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. पसंतीचे बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रांबाहेर मोठ्या रांगा लागत आहेत. या गर्दीत शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत. जिल्हा परिषदेच्या कालच्या सर्वसाधारण सभेतही बियाण्यांचा तुटवडा आणि पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते.
खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. शेतकरी सध्या खरीप हंगामाच्या तयारीत गुंतला आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या बी-बियाण्यांसाठी शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करून पसंतीचे बियाणे मिळावे यासाठी तहान भूक विसरून कृषी केंद्रांवर भर उन्हात उभे राहत आहेत. शेतकऱ्यांची मागणी असलेल्या कपाशी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून, जादा दराने विक्री हाेत आहे. कृषी विभागाची पथके करतात काय, असा सवाल करीत जिल्हा परिषदेच्या सभेत सदस्य आक्रमक झाले.
कृषी अधिका-यांना धारेवर धरले
सर्वपक्षीय सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आणि कंपनी व अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा गंभीर आराेपही सदस्यांनी केला. शेतकऱ्यांसाठी अघाेषित आणाबाणीसारखीच परिस्थिती असल्याची टिका विराेधकांनी केली. अन्य जिल्ह्यातून बियाणे उपलब्धतेबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदाच्या खरीप हंगामात तरी समाधानकारक पीक हाेईल, या आशेने शेतकरी कामाला लागले आहेत. गुरुवारपासून कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांना बियाणे विक्री सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेल्या कपाशी बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचे पडसाद बुधवारी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत उमटले. सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे गट नेते ज्ञानेश्वर सुुलताने, शिवसेनेचे गाेपाल दातकर, डाॅ.प्रशांत अढाऊ, संजय अढाऊ, कांॅग्रेसचे गट नेते चंद्रशेखर चिंचाेळकर, गाेपाल भटकर, रामकुमार गव्हाणकर, गजानन पुंडकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केली.
प्रभारी कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी बियाण्यांची मागणी व पुरवठा याबाबत माहिती दिली. आता अन्य ठिकाणाहून बियाण्यांच्या पुरवठ्यासाठी प्रयत्न हाेणार आहेत. सभेला अध्यक्ष संगीता अढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, माया नाईक, रिझवाना परवीन, याेगिता राेकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, सचिव कालीदास तापी यांच्यासह सदस्य हाेतेे.
पाणी टंचाईचा मुद्दाही गाजला!
जिल्ह्यात सध्या अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून या मुद्द्यावरून सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. पाणी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली.