Akola district जिल्ह्यात कपाशी बियाणे मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. भर उन्हात रांगेत उभे राहूनही बियाणे मिळत नसल्याने आज (ता. 28) संतापलेल्या शेतकऱ्यांनी अकोल्यातील टिळक रोडवर ‘रास्ता रोको’ करीत संताप व्यक्त केला. कृषी विभाग मात्र कुठलीही ठोस भूमिका पार पाडताना दिसत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. आर्थिक जुळवाजुळव करून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पेरणीसाठी पसंतीचे बियाणे मिळावे अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र, काही दिवसांपासून तहान भूक विसरून शेतकरी कृषी केंद्रांच्या चकरा मारत आहे. कृषी केंद्रांसमोर भर उन्हात दिवसभर रांगा लावून बियाणे खरेदीसाठी गर्दी करीत आहे. इतकं करूनही पदरी निराशाच पडत असल्याने शेतकरी संतापला आहे. त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज अकोल्यातील टिळक रोड रास्ता रोको आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला आहे.
म्हणून केले आंदोलन!
जादा उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. कृषी केंद्र चालकांकडून आज दुकान उघडण्यात न आल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले. या हंगामात बियाणे खरेदीला सुरुवात झाली. यंदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा दिसून येत आहेत. केंद्रावर नंबर लागल्यानंतर केवळ शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोनच पॅकेट बियाण्याचे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अनेक गावातील शेतकरी रस्त्यावर उतरले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली.
बियाण्यांचा तुटवडा
बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला आहे. काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. सकाळपासून रांगेत बसावे. कूपन मिळाल्यानंतर दुपारी भर उन्हात रांगेत उभे रहावे लागते. मात्र, त्यानंतरही पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या सयंमाचा बांध फुटला आहे.
कृषी विभागाने योग्य नियोजन करावे!
गेल्या काही दिवसांपासून पसंतीच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना भटकावे लागत आहे. भर उन्हात गर्दी करून बियाण्यांसाठी अख्खा दिवस कृषी केंद्रावर गमवावा लागत आहे. कृषी विभागाने योग्य नियोजन करून बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. या भागातील शेतकरी तशी अपेक्षा बाळगून आहे.