गोंदियातील बिरसी विमानतळावर इन्स्ट्रूमेंट लँडिंग सिस्टम (आयएलएस) ही अत्याधुनिक यंत्रणा लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने कमी दृश्यतेतही विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग करणे शक्य होणार आहे. यामुळे विमानतळावरील सेवा अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. यामुळे गोंदियावासीयांना कोरोना काळाची आठवण झाली आहे.
कोरोना काळात बिरसी विमानतळावरील आयएलएस यंत्रणा काढून मंगलोर विमानतळावर नेण्यात आली होती. परिणामी, बिरसी येथे रात्रीच्या वेळेस लँडिंग करणे अशक्य झाले होते. या सुविधेच्या अभावामुळे विमानतळावरील कार्यक्षमता मर्यादित झाली होती. मात्र, आता ही यंत्रणा रशियावरून मागवून ती पुन्हा स्थापित करण्यात आली आहे.
डीजीसीएची तपासणी करणार..
आयएलएस यंत्रणा प्रस्थापित झाल्यानंतर नागरी विमान उड्डाण महासंचालनालयाच्या (डीजीसीए) चमू विमानतळाची पाहणी करणार. त्यांच्या तपासणीनंतर प्रमाणपत्र मिळाल्यानंतर नाईट लँडिंगची सेवा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे संचालक शफीक शाह यांनी दिली.
प्रवासी विमानसेवेला मिळणार गती..
1 डिसेंबर 2023 पासून बिरसी विमानतळावरून गोंदिया-हैदराबाद-तिरूपती प्रवासी विमानसेवा सुरू झाली आहे. ही सेवा गेल्या वर्षभरापासून सुरळीतपणे चालू आहे. दररोज 100 ते 150 प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतात. इंडिगो विमान कंपनीनेही मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मार्गांवर सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, नाईट लँडिंग सुविधेच्या अभावामुळे या योजनांमध्ये अडथळे आले होते. आता ही सुविधा पुन्हा कार्यान्वित झाल्यामुळे नवीन मार्गांवरही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
MSRTC : प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी एसटी महामंडळात “प्रवासी राजा दिन”
प्रशिक्षण केंद्राला मोठा दिलासा..
बिरसी विमानतळावर असलेल्या पायलट प्रशिक्षण केंद्रालाही आयएलएस यंत्रणेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. कमी दृश्यतामानाच्या परिस्थितीत प्रशिक्षण घेणे कठीण जात होते. आता या समस्येचे समाधान झाल्याने प्रशिक्षण अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल.
बिरसी विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. या ठिकाणी भविष्यातील हवाई सेवांसाठी मोठी क्षमता आहे. नाईट लँडिंगची सुविधा कार्यान्वित झाल्यामुळे या विमानतळावरून अधिक प्रवासी सेवा आणि मालवाहतूक सेवांना प्रोत्साहन मिळेल. बिरसी विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधा ही प्रवासी आणि व्यावसायिक दोघांसाठीही महत्वाची बाब ठरणार आहे. डीजीसीएकडून अंतिम प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सेवा सुरळीत सुरू होईल. यामुळे गोंदिया जिल्ह्याच्या विकासाला आणि प्रवासी सुविधांना नवी दिशा मिळणार आहे.