Assembly Election : महाविकास आघाडीतील जागा वाटपांवरील चर्चा मंगळवारी (22 ऑक्टोबर) संपून यादी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विधान सभेचे विरोधी पक्षनेते यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जागा वाटपावर भाष्य केलं. तीन पक्षांमध्ये आघाडीमधून लढताना काही प्रमाणात नाराजीला सामोरे जावे लागते. नाराज कार्यकर्त्यांची आम्ही समजूत काढू आणि महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरे जाऊ, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
आघाडीत अंतिम 17 जागांवर चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत जागा वाटपाची चर्चा संपेल. शिवसेनेसोबत पाच जागांबाबत तिढा आहे. हा तिढा देखील सुटेल असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या वाट्याला कोणत्या जागा मिळाल्या याबाबत मल्लिकार्जुन खर्गे आणि वेणू गोपाल यांच्याशी चर्चा झाली आहे. काही जागांवर पेच निर्माण झाला होता, त्यावर काय मार्ग काढावा याबाबतही हायकमांडशी चर्चा केल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळपर्यंत हा तोडगा निघेल असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
जागांचा वाद
रामटेक, अमरावतीमधील काही जागांवरून उद्धवसेना काँग्रेसमध्ये सुरू झालेला वाद सोमवारी कायम होता. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार संजय राऊत यांनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे वाद आणखी विकोपाला गेला. काँग्रेसकडून रमेश चेन्नीथला यांनी सौम्य भूमिका घेतली आहे. त्यामुळे जागा वाटपातील अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. ख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसकडून अद्याप उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर झालेला नाही, असं नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु एकूणच काँग्रेसच्या भूमिकेमुळे शिवसेना आता समाधानी असल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. विदर्भातील 12 आणि मुंबईतील 6 जागांवरून शिवसेना मात्र माघार घेणार नसल्याचं राऊत ठामपणे सांगत आहे.
काँग्रेसची पहिली यादी मंगळवारी (22 ऑक्टोबर) जाहीर होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सोमवारी या घडामोडीत दिली आहे. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी सध्या काँग्रेसचे काही नेते दिल्लीकडे रवाना झाले आहेत. विदर्भातील जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही. माध्यमांनी उगाच भांडणांना सुरुवात करून देऊ नये, असे पटोले म्हणाले. मंगळवार सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे जागावाटप जाहीर होईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आघाडी केवळ मेरीटच्या आधारावर उमेदवार देणार आहे. यावेळी जातपात वैगरे काहीही पाहणार नाही. शरद पवारांनी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला फोन केला नाही, असंही पटोले म्हणाले.