Scam News : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाटप केल्या जाणार्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी म्हणजेच मनरेगा योजनेमध्ये 16 कोटींचा घोटाळा झाला आहे. गावागावातून अनुदानित विहिर वाटपासाठी तब्बल 60 हजार रूपये शेतकर्यांकडून उकळण्यात आल्याचा आरोप करीत प्रकरणाची सखोल चौकशी व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चिखली काँग्रेसच्यावतीने माजी तालुकाध्यक्ष सत्येंद्र भुसारी यांनी केली आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघ हा भाजपाच्या ताब्यात आहे. आमदार श्वेता महाल्ले या मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचे ‘होमटाऊन’ असलेल्या चिखली पंचायत समितीअंतर्गत गावागावांतील शेतकर्यांना मनरेगा योजनेअंतर्गत अनुदानित तत्वावर विहिर वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये पात्र ठरण्यासाठी अनुदान तत्वावर विहिर वाटपाची निवड यादी करणे प्रक्रिया सुरू आहे. यात प्रतिशेतकरी 60 हजार रूपये प्रमाणे घेतले जात आहेत. या योजनेत पंचायत समिती ते गावपातळीपर्यंत भ्रष्टाचार सुरू असून शेतकर्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ही बातमी वाचली का?
Lok Sabha Election 2024 : मातृतीर्थाच्या जिल्ह्यात लोकसभेच्या दोन महिला समोरासमोर
असाच प्रकार जनावरांच्या गोठ्यांच्या बाबतीत घडला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गेल्या आठवड्यात यासंदर्भात कारवाई केली होती. मनरेगाच्या विहिर वाटप प्रकरणातील भ्रष्टाचार थांबवून चौकशीची मागणी आता होत आहे. दोषींवर कारवाई करीत, शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी चिखली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी चिखलीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
भुसारींच्या तक्रारीत काय?
डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी नमूद केले आहे की, चिखली तालुक्यातील शासकीय योजनेमार्फत वाटप केल्या जाणाऱ्या अनुदानित विहिरींच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे. हा प्रकार तातडीने थांबवून शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यात यावी. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांची अनुदानतत्वावर विहिर वाटपासाठी निवड यादी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या यादीमध्ये ग्रामपंचायतस्तरावरून आलेल्या इच्छुक पात्र शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यातील सत्यता पडताळून त्या नावांच्या यादीला मान्यता देण्याची गरज आहे. परंतु हे करीत असताना पात्र शेतकऱ्यांच्या यादीचा आधार घेत पैशांची मागणी करण्यात येत आहे. प्रतिशेतकरी 60 हजार रूपये काही सरपंच, ग्रामसेवक आणि पंचायत समितीमधील कर्मचारी उकळत आहेत.
16 कोटींचे गणित
भ्रष्टाचाराचा असाच प्रकार जनावरांच्या गोठ्याच्या बाबतही झाल्याचे उघड झाले आहे. एका गावांला साधारणतः 15 विहिरींचे वाटप केले जाणार आहे. तालुक्यातील 172 गावात जवळपास 2 हजार 400 पेक्षा अधिक विहिरींचे उद्दिष्ट आहे. प्रतिविहीर 60 हजार रूपये लाच घेतली जात असेल तर तब्बल 16 कोटी रूपयाचा भ्रष्टाचार मनरेगाच्या विहिरींमध्ये होत असल्याची शंका भुसारी यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी लढत आहोत. आमचा कोणत्याही नेत्याशी किंवा पक्षाशी वाद नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही ही काळजी प्रशासनाने घ्यावी एवढीच रास्त अपेक्षा आहे. – सत्येंद्र भुसारी