महाराष्ट्र

Assembly Election : भागवत म्हणाले, ‘राजकारणावर नंतर कधी बोलू’

Doctor Mohan Bhagwat : फक्त मतदानासाठी उत्तराखंडमधून नागपुरात दाखल

RSS Nagpur Voting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राजकारणावर कधीही थेट भाष्य करत नाहीत. संघाच्या उत्सवांमधील त्यांच्या भाषणातही अर्थ काढून घ्यावा लागतो. पण अगदीच अपवादाचे प्रसंग सोडले तर राजकारणावर थेट कुठलेही भाष्य करताना ते दिसत नाही. बुधवारी मतदान झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी राजकारणासंदर्भात प्रश्न विचारला. पण त्यांनी ‘आजच्या दिवशी राजकारणावर बोलणार नाही, नंतर कधी बोलुया’ असे उत्तर दिले.

डॉ. मोहन भागवत यांनी महाल मधील एका केंद्रावर मतदान केले. त्यानंतर त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी घेरले. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने बजावलेच पाहिजे, असे ते म्हणाले. पण त्यानंतर सध्याच्या राजकारणाचा स्तर खालावला आहे, यावर तुमचे काय म्हणणे आहे, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. त्यावर मोहन भागवत यांनी ‘आजच्या दिवशी राजकारणावर बोलणार नाही, नंतर कधी बोलुया’, अशी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रातील राजकारणाच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध नेत्यांनी यापूर्वी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. काहींनी तर आपल्या लेखांमधून राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे मतही यापूर्वी मांडलेले आहे. विशेष म्हणजे लोकसभेत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत टाळायचे असेल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात प्रचार होणे आवश्यक आहे, अशी सूचनाही संघाकडून भाजपला आली होती, अशी चर्चा होती. त्यानंतर नितीन गडकरी यांनीच सर्वाधिक सभा घेत महाराष्ट्र पिंजून काढला.

महाराष्ट्रात नितीन गडकरी यांच्या अवघ्या 13 दिवासांत ७२ सभा झाल्या. एका वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, नितीन गडकरी यांच्या सभांची सर्वाधिक मागणी महाराष्ट्रात होती. महायुतीचा उमेदवार असलेल्या प्रत्येक मतदारसंघातून गडकरींच्या सभेची मागणी होती. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सूचनेनुसारच हे सारे घडत असल्याचीही माध्यमांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, आज मतदान झाल्यानंतर मोहन भागवत यांनी नेहमीप्रमाणेच राजकारणावर कुठल्याही प्रकारचे भाष्य करण्याचे टाळले. यावेळी मोहन भागवत यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, मध्य नागपूरचे भाजपचे उमेदवार प्रवीण दटके देखील होते.

Gadchiroli Election : घनदाट जंगल, नक्षल्यांचा धोका अन् त्यांची पायपीट

उत्तराखंडमधून नागपुरात

लोकशाहीमध्ये मतदान हे जनतेचे कर्तव्य आहे. प्रत्येकाने हे कर्तव्य पार पाडायला पाहिजे. मी सकाळी सर्वांत पहिले मतदान करून घेतो. त्यानंतर इतर कामांना हात लावतो, असं भागवत यांनी सांगितलं. मी उत्तरांचलमध्ये होतो. फक्त मतदानासाठी नागपुरात आलोय. मतदान झाल्यानंतर मी परत निघून जाणार आहे, असंही ते म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!