Bhandara : भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील गोंडीटोलाच्या सरपंच पदमुक्त होऊन काही महिने झालेत. पण वेबसाईट अपडेट न केल्यामुळे त्या ‘डिजीटली’ आजही पदावर आहेत. नवनिर्वाचित सरपंचाची वेबसाईटवर नोंदच करण्यात आलेली नाही. उलट पदमुक्त सरपंचाला पदाचे मानधन दिले जात आहे. तुमसर पंचायत समितीने हा घोळ केला आहे.
त्यामुळे गोंडीटोला ग्रामपंचायतची वेबसाइड कधी अपडेट होईल? वेबसाइटवर नवनिर्वाचित सरपंचांचे नाव कधी येईल? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गोंडीटोला ग्रामपंचायतचे सरपंच आणि अन्य दोन सदस्य नोव्हेंबर 2023 मध्ये पदमुक्त झाले आहेत. पदाचा प्रभार उपसरपंच यांना देण्यात आला आहे. गोंडीटोला ग्रामपंचायतच्या वेबसाइटवर आधी सरपंच आणि नंतर प्रभारी सरपंच यांची नोंद घेण्यात आली आहे.
सद्यःस्थित ग्रामपंचायतच्या वेबसाईटवर पदमुक्त झालेले सरपंच आणि अन्य दोन सदस्य कार्यरत आहेत. 15 जानेवारीला सरपंच पदावर शीतल चिंचखेडे यांची निवड झाली आहे. सरपंच पदाचा कारभार सांभाळताना सहा महिने निघून गेले आहेत. ग्रामपंचायत विविध वेबसाईटवर नोंद घेण्याची जबाबदारी पंचायत समिती स्तरावर केली जात आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून विद्यमान सरपंच शीतल चिंचखेडे यांचे नाव अपलोड करण्यात आले नाही. याच ग्रामपंचायतचे दोन सदस्य अपात्र झाले आहेत. त्यांची नावे वेबसाईटवरून काढलेली नाहीत. ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालकांचे पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. यामुळे गावातील शासकीय माहिती सादर करण्याची कामे पंचायत समिती स्तरावरून केली जात आहेत.
आरोप तर होणारच
गत सहा महिन्यांपासून गोंडीटोला ग्रामपंचायतीचे सरपंच माहीत नसावे का? हा एक प्रश्न आहे. यावरून गोंडीटोला ग्रामपंचायतीचे सरपंच कोण? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
गावातील कामकाजाचे अधिकार सरपंच यांना देण्यात आले असले, तरी शासकीय वेबसाइटवर मात्र सरपंच पदावर शीतल चिंचखेडे नाहीत. असा घोळ घातला जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
गावकऱ्यांची धावपळ
संगणक परिचालक पदावरील तरुण पोलिस पाटील झालेत. त्यामुळे परिचालकाचे पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त झाले आहे. ग्रामपंचायतची डिजिटल कामे करण्यासाठी संगणक परिचालकांचे पद महत्त्वपूर्ण आहे. परंतु, संगणक परिचालक नसल्याने दाखले मिळविण्यासाठी गावकऱ्यांची धावपळ सुरू आहे.