Jalana : संत्रे कुटुंबाला झालेली मारहाण हा सत्तेचा माज आहे. एखाद्या गावात जमिनीवर नजर पडली तर ती जागा दानवे यांना दिली पाहिजे, असा दबाव सत्ताधारी खासदार, आमदार यांनी या कुटुंबावर टाकला. घर जबरदस्तीने पाडून कुटुंबाला मारहाण केली. कुंभार समाजातील हे कुटुंब दिवस रात्र कष्ट करून उदरनिर्वाह करते. पण जमीन हडपण्यासाठी या कुटुंबाला त्रास दिला जातो, मारहाण केली जाते.
संत्रे कुटुंबाच्या छळाचा मुद्दा आपण विधानसभेत लावून धरू अशी ग्वाही विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
गुंडांचे राज्य आणायचे का?
भाजपवाल्यांना महाराष्ट्रात गुंडांचे राज्य आणायचे आहे का? पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन काय करत आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी आज उपस्थित केला आहे. गरीब कुटुंब आहे म्हणून त्रास देता. पण संत्रे कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. विधानसभेत आवाज उठवू, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.
दानवे कुटुंबावर आरोप
जवखेडा गावात, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करून घर उद्ध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियानी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग बनवण्यासाठी नियमाचे उलंघन करून घर उद्ध्वस्त केल्याचा संत्रे कुटुंबाचा आरोप आहे. उद्ध्वस्त घराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या अन्यायग्रस्त संत्रे कुटुंबाची जवखेडा येथे वडेट्टीवार यांनी भेट घेतली. यावेळी घडलेल्या घटनेची माहिती घेऊन संत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
वडेट्टीवार म्हणाले, जवखेडा गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753, एम.साठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबाला मारहाण केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने घर उद्ध्वस्थ केले असा, आरोप पीडित संत्रे कुटुंबाने केला आहे.
Vijay Wadettiwar : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येस महायुतीचे सरकार कारणीभूत
अज्ञात आठ ते दहा जणांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करत घर उद्ध्वस्थ केल्याची घटना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या गावात घडली आहे. जवखेडा गावातील कुंभार समाजाच्या संत्रे कुटुंबियांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करून न्याय मिळावा मागणी केली आहे. या प्रकारणी हसनाबाद पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे हसनाबाद पोलिसांनी आज्ञात आठ ते दहा जणांविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, हाय वे जात असताना स्वतःच्या जमिनी, घर वाचवायचे पण दुसऱ्यांची जमीन घ्यायची ही सत्तेतील मस्ती आहे. आम्ही ही मस्ती उतरवणार. संत्रे कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.या कुटुंबाला काही झालं तर रावसाहेब दानवे आणि त्यांचे कुटुंब याला जबाबदार ठरेल. संत्रे कुटुंबाने दानवे यांचे नाव घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दखल करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.