मुंबईतील वरळीत असलेल्या एका प्रसिद्ध मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाखवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडलं होतं. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना, दाम्पत्याच्या दुचाकीला एका बीएमडब्लु कारने धडक दिली. अपघातात महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. घटनेतील आरोपी चालक हा फरार झाला होता. यावरून खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
वरळीत 7 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास प्रदीप नाखवा (वय 50) हे त्यांच्या पत्नी कावेरी प्रदीप नाखवा (वय 45) यांच्यासोबत त्यांच्या स्कुटीवरुन डॉ. बेझंट रोड वरुन वरळी कोळीवाड्याकडे जात होते. या दरम्यान लॅन्डमार्क जीप शोरूम जवळ येणाऱ्या बीएमडब्लु कारने त्यांच्या स्कुटीला मागून जोराची धडक दिली. कारचालक धडक देऊन थांबला नाही. तर त्याने नाखवा दाम्पत्य गाडीच्या बोनेटवर पडल्यानंतर ब्रेक दाबला. यानंतर हे दाम्पत्य गाडी खाली पडलं. कारचालकाने महिलेच्या अंगावर गाडी चढवली. त्यानंतर त्याने महिलेला दूरपर्यंत फरफटत नेलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हा शिवसेनेचा उपनेता राजेश शाह यांचा मुलगा आहे. त्याचं नाव मिहीर शाह असून पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर आरोपी मिहीर शाह फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आरोपीच्या नावावरुन थेट अमित शाह यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणले कि, “शिंदेंचे लोक आज फरार होतात. एकनाथ शिंदेही एक दिवस फरार होणार. एक गुंडांची टोळी सरकार चालवत आहे. वरळीतल्या घटनेतील आरोपीचं मिहिर शाह असे नाव आहे. शाह हे त्यांचं आडनाव, हे क्राईम करून पळणारी लोकं आहेत”, असं म्हणत संजय राऊतांनी मिहीर शाह याच्या नावावरुन थेट अमित शाह यांना टोला लगावला.
योद्ध्याची योद्धाशी भेट
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघात निवडणूक लढवणारे उमेदवार अजय राय यांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “100 टक्के मोदी आणि अमित शाह जास्त दिवस दिल्लीत राहणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले. “पुढच्या वेळी नरेंद्र मोदी वारणसीतून निवडणूक लढण्यासारखी परिस्थिती राहणार नाही. वाराणसीतून मोदी पुन्हा निवडणून येतील, असं वाटत नाही. एक योद्धा दुसऱ्या योद्ध्याला भेटण्यासाठी आलेला आहे”, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी वरळीतील हिट अँड रन प्रकरणावरुन थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.