Mahavikas Aghadi : महाराष्ट्रमध्ये भाजपची सत्ता येतात मराठी माणसाला धमक्या दिल्या जात आहे. फडणवीस यांच्या भोवती असलेली मराठी पिलावळ या धमक्या देत आहे. डुप्लिकेट शिवसेना देखील या संदर्भामध्ये गप्प आहे. त्यामुळे मुंबईतील मराठी माणूस घाबरला आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महायुतीवर टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषिकांच्या हितासाठी शिवसेना स्थापन केली. डुप्लिकेट शिवसेनावाल्यांनी या उद्देशालाच हरताळ फासला आहे. सरकार स्थापन करताना महायुतीला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीलाच अशी परिस्थिती आहे तर पाच वर्षे ही मंडळी सरकार कसं चालवणार, असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला.
भूमाफिया सक्रिय
राज्यभरातील मोक्याच्या जमिनी बळकावल्या जात आहे. बिल्डर आणि भूमाफियांच्या घशामध्ये ही जमीन घातली जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांची या भूमाफियांसोबत साटेलोटे आहे. अतिशय कवडीमोल किमतीत राज्य सरकारच्या अनेक जमिनी नेते बळकावत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्रात जमीन शिल्लक राहणार की नाही, असा प्रश्न निर्माण होत असल्याचे संजय राऊत म्हणाले.
भाजपने महाराष्ट्र गुजरातला विकला आहे. काही गद्दार त्यांच्यासोबत सत्तेमध्ये सहभागी झाल्याने हे सर्व शांतपणे पाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. भाजप आणि त्यांच्या हॅकर्सनी गैरप्रकार करून विधानसभा निवडणूक जिंकली. पण पाप करून फार काळ टिकता येत नाही. त्यामुळे या सरकारचे लवकरच अध:पतन होईल, अशी टीकाही संजय राऊत यांनी केले.
गैरप्रकार करून मिळवलेल्या या यशानंतर महायुती आता सर्व प्रकारचा भ्रष्टाचार करायला मोकाट झाली आहे. देशामध्ये विरोधी पक्ष शिल्लक राहू नये, असा प्रयत्न भाजपचा आहे. एकदा विरोधी पक्ष संपला की आपण देश लुटायला मोकळे आहोत, हे त्यांनी ठरवले आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून पुन्हा एकदा विरोधी पक्षातील नेत्यांवर अन्याय केला जाईल, अशा आरोपही संजय राऊत यांनी केला.
धडा शिकवणार
भाजप आणि गद्दारांच्या शिवसेनेने गैरप्रकार करून यश बळकावले आहे. त्यामुळे या चोर सरकार विरुद्ध शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष लढा देणार आहे. ईव्हीएमच्या ऐवजी हिम्मत असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपने मतपत्रिकांवर निवडणूक घेऊन दाखवावी. महाराष्ट्रातील एका गावामध्ये मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात येणार होती. पण भाजपला त्याच्यामुळे धडकी भरली. आपलं बिंग उघड पडेल, ही भीती त्यांना वाटू लागली. त्यामुळे सत्ता आणि बळाचा वापर करून ही मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. ज्या व्यक्तीला चोरीचा भय नसते तो कोणत्याही तपासाला घाबरत नाही. परंतु भाजप आणि डुप्लिकेट शिवसेना यांची भीती पाहून नक्कीच काहीतरी चुकीचं झाल्याचं ठाम होते, असही खासदार संजय राऊत म्हणाले.