Mohan mte : महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे घोडे अडलेलेच असून दक्षिण नागपूरच्या जागेवरूनदेखील वाद सुरू आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान आमदार मोहन मते यांना तेथून परत उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मते यांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनाच आव्हान दिले आहे. दोन्ही नेत्यांमधला वाद संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. जर हिंमत असेल तर संजय राऊत किंवा नाना पटोले यांनी माझ्या विरोधात लढावे. दक्षिण नागपुरातून निवडणूक लढवून दाखवावी, असे ओपन चॅलेंज मोहन मते यांनी दिले आहे.
लक्ष दक्षिण नागपूर मतदारसंघावर
दक्षिण नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघावरून महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्हे असून काँग्रेस व उद्धवसेनेने येथे दावा केला आहे. यावरून मते यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चिमटा काढला. नागपुरात भाजपला केवळ दोनच जागा मिळतील असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून अद्याप एकही तिकीट घोषित देखील झालेले नाही.
नेते जागांसाठी एकमेकांशी भांडत आहेत. त्यातच संजय राऊत व नाना पटोले यांच्यातील वाद तर राज्य पाहत आहे. मुळात या दोन्ही पक्षांना दक्षिण नागपुरातूनच बहुतेक पहिला पराभव हवा आहे. मी मुंबईत जाऊन ठाणं मांडणारा नाही तर मतदारसंघात जाणारा आमदार आहे. त्यामुळे काँग्रेस-उद्धवसेनेच्या नेत्यांनी दक्षिण नागपुरात येऊन त्यांच्या पक्षाची प्रत्यक्ष स्थिती पाहावी. राऊत व पटोले यांनी आपापसात वाद न घालता माझ्याविरोधात लढावे, असे आव्हान मते यांनी दिले.
Vijay Wadettiwar : ये फेवीकॉल का मजबूत जोड है, टुटेगा नही..!
शिवसेनेला पाऊल मागे घ्यावेच लागेल
दक्षिण नागपूरसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) पाऊल मागे घ्यावेच लागेल, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. दक्षिण नागपूरवर काँग्रेसचा दावा कायम आहे. याठिकाणी कुठल्याही परिस्थितीत आमचाच उमेदवार लढेल. कारण या जागेवर निवडून येण्याची शंभर टक्के खात्री आहे. ठाकरे गटाकडे उमेदवारही नाही आणि खात्रीही नाही. शिवाय ज्या नावासाठी ते आग्रही आहेत त्या उमेदवाला गेल्यावेळी अवघे चार हजार मते मिळाली होती. त्यामुळे ठाकरे गटाने हट्ट सोडावा, अशी स्पष्ट भूमिका नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे.