Bangladesh Crisis : भारतीय जनता पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हिंदू प्रेम केवळ देखावा असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दिल्ली येथे प्रसारमाध्यमांची संवाद साधताना त्यांनी बांगलादेशातील परिस्थितीवरून सरकारवर निशाणा साधला. भारताची फाळणी झाल्यामुळे अनेक हिंदूंना पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये नाईलाजाने राहावे लागत आहे. बांगलादेशातील हिंदू आणि भारतातील हिंदू हा काही वेगळा नाही. आता बांगलादेशमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहे. पण केंद्र सरकार हातावर हात धरून बसली आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे इतर नेते हिंदुत्ववादी असल्याचा दावा करतात. मात्र सरकारने बांगलादेश-भारत सीमा बंद केली आहे. त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंना भारतामध्ये येता येत नाही. बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंची कत्तल होत आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचे संजय राऊत म्हणाले. विरोधी पक्षाकडून संसदेमध्ये बांगलादेशाच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. परंतु सरकार हे सगळे प्रस्ताव फेटाळून लावत असल्याचे राऊत म्हणाले.
सुरक्षेला जबाबदार कोण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप मणिपूर मधील हिंसाचारावर बोलायला तयार नाही. आता बांगलादेशमध्ये सुरू असलेला अत्याचार हा त्या देशातील अंतर्गत बाब असल्याचे सांगण्यात येत आहे. बांगलादेशातील अराजकता ही जरी एखाद्या देशातील अंतर्गत बाब असली, तरी तेथे केवळ हिंदू समाजाला टार्गेट केले जात आहे. त्यामुळे हिंदू समाजाने कोणाकडे पहावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. भारतीय जनता पार्टीसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजाबद्दल कळवळा असल्याचे दाखवतो, असे राऊत म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीला हिंदूंबद्दल मनापासून काही वाटत असेल तर त्यांनी कृती करावी. बांगलादेश मधील संकटात असलेल्या हिंदू समाजाला भारतात आणावे. पाकिस्तान मध्ये असा प्रकार घडला असता तर नरेंद्र मोदी यांनी मोठी भाषणबाजी केली असती. परंतु बांगलादेशच्याबाबत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारची भूमिका वेगळी का आहे? असा प्रश्नही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
हिंदू एकच
जगभरामध्ये कोणतेही देशात हिंदू समाज असला तरी तो एकच आहे. त्याचे मूळ हिंदुस्थानातील आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बांगलादेशातील हिंदू संकटाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी देखील खासदार राऊत यांनी केली. हिंदू समाजाचं संरक्षण नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सरकारला करता येत नसेल तर त्यांनी उगाच बढाया मारू नये असेही ते म्हणाले.