Political News : प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री पद देण्यात येऊनही त्यांनी ते नाकारले. शिवसेना खासदार संजय राऊतांनी यावरून निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपासह अजित पवार गटावर टीका केली आहे. प्रफुल्ल पटेलांबाबतही राऊतांनी मोठा दावा केला आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. त्यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक खासदार मंत्रिपदाची शपथ घेतली. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांची वर्णी लागण्याची चर्चा होती. या चर्चेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात आनंद होता. भंडारा-गोंदियातही उत्साह होता. मात्र आपण मंत्रिमंडळात समाविष्ट होण्यास नकार दिल्याचे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले.
मंत्रीपद नाकारले हा मुद्दा घेऊन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार गटाबाबतही राऊतांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘अजित पवारांच्या बाबतीत आम्हाला बरेच काही कळले आहे. दाऊदशी संबंधित असलेली प्रफुल्ल पटेलांची 150 कोटींची प्रॉपर्टी क्लिअर झाली आहे. अजून काय पाहिजे? ईडीने जप्त केलेली ही प्रॉपर्टी क्लिअर झाली. सर्व गुन्हे मागे घेतले गेले. मग मंत्रिपद कशाला पाहिजे? असे राऊत म्हणाले.
पवारांच्या वाट्याला भोपळा
अजित पवारांच्या वाट्याला केंद्रात भोपळा आला आहे. मोदींनी एक कॅबिनेट मंत्रिमंडळ ओढूनताणून बनवले आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. नकली शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. यांना त्यांची लायकी मोदींकडून दाखवली गेली. तुम्ही आमचे आश्रित आहात, असे भाजपाने शिंदे यांना दाखवून दिले, असे संजय राऊत म्हणाले.
राज्यमंत्रिपद नको होते
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी कॅबिनेट मंत्री होते. त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून गेल्या काही सरकारमध्ये आपली सेवा दिली आहे. पवार गटाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार देण्यात आला. आमची अमित शाह आणि जे.पी. नड्डा, राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा झाली. नंतर आम्हाला सांगण्यात आले की, राज्यमंत्री स्वतंत्र प्रभारचे पद मिळणार आहे. आम्हाला वाटले की प्रफुल्ल पटेल यापूर्वी कॅबिनेट मंत्री होते. आता राज्यमंत्री पद योग्य राहणार नाही. त्यामुळे आम्ही नकार दिल्याचे अजित पवार यांनी आधीच स्पष्ट केले आहे. महायुतीत कोणतेही मतभेद नसल्याचे अजित पवार म्हणाले आहे.
पवारांच्या या दाव्याचीही राऊत यांनी खिल्ली उडविली. भाजपने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, असे राऊत यावर म्हणाले. शपथविधी सोहळ्यानंतर काँग्रेसनेही पवारांवर टीका केली होती. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पवार यांच्याबाबत शपथविधीनंतरच विधान केले. भाजपचे काम आता संपले आहे. त्यामुळे त्यांनी पवारांना ‘डस्टबीन’मध्ये फेकून दिल्याचे वडेट्टीवार म्हणाले.