आचारसंहिता लागू होऊन तीन दिवस लोटले तरीही महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी 75 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी शिंदे गटाला 90 ते 95 जागा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा दिल्लीत महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील निवडणूक आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला यावर चर्चा झाली. यात भाजपच सर्वाधिक जागा लढणार असल्याची माहिती आहे. भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गट 75 ते 80 जागा लढेल. तर राष्ट्रवादी अजित पवार गट 55 ते 60 जागा लढणार असल्याची माहिती आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांनी 75 जागा जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले, ‘आम्हाला 90 ते 95 जागा मिळतील आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 70 ते 75 जागा आम्ही जिंकू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या दिल्लीत बैठका झाल्या. यात महायुतीच्या जागा वाटपाचे नियोजन झाले. कशा पद्धतीने कुठल्या पक्षाने किती जागा लढायच्या आणि तिन्ही पक्षांची गेल्यावेळी काय स्थिती होती, याचा विचार केला गेला. त्यानुसार स्थानिक मतदानाची टक्केवारी लक्षात घेऊन जागा वाटप ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया आमदार संजय रायमुलकर यांनी दिली आहे.
Assembly Election : कोणी महाराजांना शरण; कोणाकडे बगलामुखीचं अनुष्ठान
काळजी करू नका – अजित पवार
रात्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीनंतर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जागावाटप फॉर्म भरण्याच्या आत केलं जाईल. तुम्ही काळजी करू नका. तिघांची बैठक झाली आहे आम्ही तिघे एकत्रित पत्रकार परिषद घेऊ. कुणाकुणाला किती जागा मिळाल्या आहेत ते स्पष्ट करू. महायुतीच्या जागावाटपामध्ये काहीही अडचण नाहीये, असं अजित पवार म्हणाले.