Maharashtra Cabinet : राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये राजकीय भूकंप आला आहे. अनेक आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांचा समावेश मंत्रिमंडळात झालेला नाही. संजय कुटे यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केलेली नाही. मात्र त्यांचे समर्थक संतापले आहेत.
संजय कुटे यांना मंत्री पद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नागपूर येथे येणार होते. हे सर्व कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याच्या तयारी होते. मात्र ऐनवेळी संजय कुटे यांनी व्हिडीओ कॉल करून आपल्या संतप्त कार्यकर्त्यांना शांत केले. त्यानंतर आता आमदार संजय कुटे यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दुसऱ्याला संपवून एखादी गोष्ट मिळवण्यात काही अर्थ नसल्याचे नमूद केले आहे.
मी गुरुजींचा मुलगा
आपल्या पोस्टमध्ये आमदार कुटे यांनी आपण श्रीराम कुटे गुरुजींचे सुपुत्र असल्याचे नमूद केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आपल्यावर आहेत. आपल्या पालकांनी आपल्यावर सुसंस्कार केले आहेत. अशा परिस्थितीत दुसऱ्याचा हक्क मारून काहीतरी मिळवणं हे आपल्याला शिकवलेलं नाही, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ‘माझ्या आईवडिलांनी मला शिकवले आहे, महत्वकांक्षा जरूर ठेवावी पण ती राक्षसी नसावी’, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Shiv Sena : मंत्रिपद न मिळाल्यानं ‘तानाजीं’नी धनुष्यबाण हटवित तलवार उपसली
‘दुसऱ्यांचा जीव घेऊन किंवा कुटनीती करून किंवा दुसऱ्यांना संपवून तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका, तुमच्या कर्तव्याने मेहनतीने सेवेने, चांगले आणि प्रामाणिक काम करून तुम्ही पुढे गेले पाहिजे. आयुष्यात आपण किती पुढे गेले पाहिजे हे वेळ आणि काळच ठरवत असते आणि याचं विचारांवर जगणारा मी एक सामान्य लहान कार्यकर्ता आहे’, असे लिहीत संजय कुटे यांनी मंत्री पद न मिळाल्याने आपल्याला काहीही फरक पडला नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आजची वास्तविकता जी आहे, ती आम्ही स्वीकारली आहे. कार्यकर्त्याना व माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना माझे एकच सांगणे आहे की वास्तविकतेत जगणे शिका.’ आमदार संजय कुटे यांनी अशा पद्धतीने लिहीत कार्यकर्त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही हे स्वीकार करा असा संदेश दिला आहे.
नमस्कार !
मी आमदार डॉ. संजय कुटे आदरणीय श्रीराम कुटे गुरुजी यांचा मुलगा आहे, आणि उर्मिलाताई यांच्यासारख्या प्रेम वत्सल्य असणाऱ्या मातेचा मुलगा आहे, एक शिक्षकाचा मुलगा आहे, माझ्या आई वडिलांनी माझ्यावर सुसंस्कृत संस्कार केले आहेत, माझ्या आईवडिलांनी मला शिकवले आहे, महत्वकांक्षा जरूर…— Dr.Sanjay Kute (@DrSanjayKute) December 16, 2024
शांततेचे आवाहन
‘मला स्वतःला असं वाटायला लागत की पार्टीच्या ज्या अपेक्षा होत्या पार्टीला जे हवे होते ते मी देऊ शकलो नसेल. कदाचित त्यामध्ये मी कमी पडलो असेल. ते मी मान्य करतो. त्याचप्रमाणे सेवा हा माझा पिंड आहे. कुटनीती मला कधी जमली नाही. राजकारणमध्ये कुटनीती मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते. पण माझ्या स्वभावात आणि संस्कारात कुटनीती कुठेही नाही. त्यामुळे कदाचित मी या प्रवाहात मी कुठेतरी बाजूला राहण्याचा प्रसंग माझ्यावर आला आहे’, असे नमूद करीत कुटे यांनी काही प्रमाणात आपली नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हे सगळे करताना भाजपला त्यांनी दोष दिलेला नाही.
कार्यकर्ते नाराज जरी असलात तरी आपली नाराजी व्यक्त करू नका. कुणालाही त्रास देऊ नका. पक्षावर किंवा आपल्या नेत्यांवर शिंतोडे उडवू नका. आपण संस्कारी आहात. मतदारसंघातील कोणत्याही युवकाला 20 वर्षात कधी बिघडू दिले नाही. आधी घर संसार शिक्षण घेऊनच राजकारण करण्याची प्रेरणा दिली आहे. यापुढे सुद्धा हीच शिकवण माझी असणार आहे, असे नमूद करीत आमदार संजय कुटे यांनी संतापलेल्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने घेतलेला निर्णय संजय कुटे यांनी स्वीकारल्याचे दिसत आहे.