महाराष्ट्र

Lok Sabha Election : भाजपमध्ये फूट संजय कुंभलकर करणार ‘हत्ती’ची सवारी

Bhandara-Gondia Constituency : पूर्व विदर्भातील लढतीला

BJP Vs BSP : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीमध्ये अचानक राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. भाजपचे जिल्हा महासचिव आणि माजी नगरसेवक संजय कुंभलकर हे बसपातर्फे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीला वेगळी रंगत निर्माण झाली आहे. भाजपाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्या उमेदवारीला भाजपामधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. संजय कुंभलकर यांच्यामुळे भाजपमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. सुरुवातीपासून सुनील मेंढे यांना विरोध करणाऱ्या भाजपमधील एका गटाला कुंभलकर यांच्या निमित्ताने सुवर्ण संधी चालून आली आहे. भाजपा आणि काँग्रेसने मतदारसंघात कुणबी समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. अशात कुंभलकर हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

भंडारा गोंदिया लोकसभेसाठी भाजपातर्फे सुनील मेंढे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसतर्फे डॉ. प्रशांत पडोळे हे निवडणूक लढणार आहेत. लढत दुहेरी होईल असे चित्र असताना अचानक भाजपचे महासचिव संजय कुंभलकर यांनी भाजपला रामराम ठोकत बसपातर्फे उमेदवारी मिळविली आहे. त्यामुळे आता भंडारा गोंदिया मतदारसंघातील निवडणूक तिहेरी होणार आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजातील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपा आणि काँग्रेसतर्फे रिंगणात असलेले उमेदवार कुणबी समाजाचे आहेत. कुंभलकर तेली समाजाचे आहेत.

निवडणुकीपूर्वी 3 मार्चला तेली समाजाचा मेळावा झाला. या मेळाव्यात ठराव घेण्यात आला. भाजप आणि काँग्रेसतर्फे तेली समाजाला नेतृत्व मिळाले नाही तर तेली समाजाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात येईल. अशा उमेदवाराला तेली समाजात पक्षीय राजकारण बाजूला सारत पाठींबा देईन. ठरावानुसार संजय कुंभलकर यांनी भाजपची साथ सोडत बसपाची उमेदवारी मिळविली आहे. भाजपमधून सुनील मुंढे यांना अगदी सुरुवातीपासून विरोध होत आहे. आता मेंढे विरोधकही संजय कुंभलकर यांच्या पाठीशी उभे राहिले तर तिहेरी लढतीत कुंभलकर पुढे निघू शकतात असे सांगण्यात येत आहे. भाजपच्या मतांचेही विभाजन होत काँग्रेसच्या उमेदवाराला त्याला फायदा होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!