Buldhana : अवैध रेती उत्खननाने नागरिकांचीच नव्हे तर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची देखील डोकेदुखी वाढली आहे. काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे हा भाग वेगळा. मात्र दुर्दैवी बाब म्हणजे आतापर्यंत जिल्ह्यात 6 जणांचा बळी गेला आहे. नेमके याच विषयावर आमदार संजय गायकवाड यांनी बोट ठेवून पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
अधिवेशनादरम्यान 28 जून शुक्रवारी सभागृहामध्ये बोलताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले की, लोणार तालुक्यामध्ये रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक केली जात असल्याचे मंत्र्यांनी सांगितले होते. हे रोखण्याकरीता भरारी पथकांची नियुक्ती देखील करण्यात आली होती. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. भविष्यामध्ये आपण भरारी पथकाची नियुक्ती करणार असल्याचे म्हटले आहे, हा शब्द पाळला गेला नाही, असे गायकवाड म्हणाले.
देऊळगावराजातील खडकपूर्णा नदीतील अवैध उत्खननाबाबत अनिल चित्ते नामक तालुकाध्यक्षाने मुख्यमंत्री व आयुक्त यांच्या मार्फत जी चौकशी केली होती, त्या चौकशीचा अहवाल शासनाकडे गेल्या एक वर्षापासून प्रलंबित आहे.
महसूलचे कक्ष अधिकारी व उपसचिव यांनी जाणीवपूर्वक हा अहवाल दाबला हे खरं आहे का?असल्यास त्यावर मंत्री काय कारवाई करणार? असा आक्रमक प्रश्न आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला.
बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन सुरूच असून आतापर्यंत 6 बळी या सर्वांनाच रेती माफिया यांनी चिरडून ठार केले. याची चौकशी करून त्या संबंधितावर आतापर्यंत काय कारवाई केली? काय कारवाई करणार आहात याचा खुलासा करणार का? असाही रोखठोक प्रश्न यावेळी मांडण्यात आला.
खडकपूर्णा नदीवरील संपुर्ण घाट कोणताही लिलाव न करता खुलेआम रेतीचे अवैध उत्खनन सुरू आहे. तातडीने झालेल्या उत्खननाचे मोजमाप करून त्याच्यावर काय कारवाई करणार आहात? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. या विषयाशी संलग्न प्रश्न उपस्थित करताना गायकवाड यांनी सांगितले की, जिल्ह्यातील 41 रेती घाट पर्यावरण विभागाकडे परवानगीसाठी गेले आहेत. त्याची तातडीने आपल्या स्तरावर बैठक लावून त्यांना परवानगी देणार का? असे जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले.
कारवाई होणार
आमदार संजय गायकवाड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आमदार गायकवाड यांनी उपस्थित केलेले प्रश्न लवकरच निकाली निघणार आहेत. त्याचा अहवाल तातडीने मागवून त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार तसेच संबंधितांना सूचना केली जाणार. अवैध वाहतुकीमुळे जो निरपराध लोकांचा मृत्यु होतो, त्या बाबतीमध्ये पोलिस प्रशासनांना कठोर कारवाईच्या सूचना दिली आहे. खडकपूर्णाच्या बाबतीमध्ये जो महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला आहे, त्या बाबतीत नक्कीच योग्य ती कारवाई केली जाईल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटीलयांनी व्यक्त केला.