East Nagpur Assembly Constituency : पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात यावेळी उमेदवारीसाठी चांगलीच चुरस बघायला मिळत आहे. महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे हे महायुतीचे उमेदवार असतील, असे चित्र आहे. पण येथे अजित पवार गटाच्या नेत्या आभा पांडे गुडघ्याला बाशींग बांधून तयार आहेत. महायुतीकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो. प्रसंगी अपक्ष लढणार, पण लढणारच, असा निर्धार आभा पांडे यांनी केला आहे.
‘चलना है – लढना है’
महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसकडे असणार, अशी सद्यस्थिती आहे. अशात ‘चलना है – लढना है, पूर्व नागपूर को बदलना है’, असे म्हणत संगीता तलमले पूर्व नागपूरच्या मतदारसंघात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पक्षश्रेष्ठींकडून शब्द मिळाल्याचे त्यांचे कार्यकर्ते ठामपणे सांगत आहेत. मतदारसंघात त्यांचे कामही सुरू असल्याचे दिसते आहे. या मतदारसंघात तेली समाजाची मते लक्षणीय आहेत. तलमले याचा चांगला फायदा उचलू शकतात.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजप येथून प्लस आहे. भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना येथून 80 हजारांवर मते मिळाली. यांपैकी 40 हजार मते फक्त गडकरींच्या नावावर मिळाल्याचे राजकीय जाणकार सांगतात. विद्यमान आमदार कृष्णा खोपडे यांच्याबाबत अॅन्टी इन्कम्बंसी आहे. त्याचा फटका यावेळी त्यांना बसू शकतो. लढत भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांतच होईल, अशी सद्यस्थिती आहे. आभा पांडे बंडखोरी करतील, हे त्यांनी ठासून सांगितले आहे. खोपडे आणि पांडे परंपरागत विरोधक आहेत. आभा पांडे हिंदी भाषीक असल्याने ही मते त्या घेतील. तसेही हिंदी भाषीक लोक खोपडेंवर नाराज असल्याचे दिसते.
तेली समाजाची जास्तीत जास्त मते संगीता तलमले घेण्याच्या प्रयत्नात आहेत. मागील निवडणुकीत कृष्णा खोडपेंच्या विरोधात पुरूषोत्तम हजारे निवडणूक लढले. त्यांनी तेव्हा बऱ्यापैकी लढत दिली होती. त्या तुलनेत संगीता तलमले तुल्यबल असल्याचे जाणकारांचे मत आहे. तलमले यांची इमेज चांगली आहे. त्यांचे कार्यकर्ते मेहनतही घेत आहेत. त्यावरून तलमले यावेळी भारी ठरू शकतात, असे चित्र आहे.
सोपी लढाई ठरेल का?
महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे दुनेश्वर पेठे उमेदवारी मागत आहेत. पण काँग्रेस हा मतदारसंघ सोडेल, असे दिसत नाही. उद्धव ठाकरे गटही या मतदारसंघावर दावा करत आहे. पश्चिम किंवा पूर्व या दोनपैकी एक मतदारसंघ आम्हाला पाहिजे, असे उद्धव सैनिक सांगत आहेत. तसे झाल्यास उद्धव सेनेकडून शेखर सावरबांधे यांना वेळेवर उमेदवारी दिली जाऊ शकते. 15 वर्षांपूर्वी शेखर सावरबांधे सतीश चतुर्वेदी यांच्या विरोधात लढले होते. तेव्हा त्यांनी 90 हजारांवर मते घेतली होती. पण तेव्हा महायुती नव्हती, तर भाजप-शिवसेना युती होती. यावेळी उद्धव गटाला येथील लढाई सोपी नाही.
नाव होते चर्चेत
तलमले यांचे नाव लोकसभा निवडणुकीच्या वेळीही चर्चेत होते. पण नंतर त्यांचे नाव मागे पडून काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघावरचा दावा तलमले आता सोडतील असे वाटत नाही. काँग्रेसची उमेदवारी संगिता तलमले यांना मिळाली आणि पक्षात गटबाजी उफाळून आली नाही. तर कृष्णा खोपडेंची वाट यावेळी अवघड होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे.