महाराष्ट्र

Sand Mafia : तहसीलदारावर हल्ल्याचा प्रयत्न 

Big threat : जिल्ह्यात वाळू तस्करांची हिंमत वाढली !

Buldhana district : बुलढाणा जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू तस्करी केली जात आहे. वाळू तस्करांची हिंमत देखील वाढलेली दिसते. मेहकर तालुक्यात वाळू माफियांवर कारवाईची मोहीम उघडणाऱ्या तहसीलदारावर घरी जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. दुसरीकडे एका तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न झाला. प्रशासनाने या घटनांकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.

वाळू तस्करांवर कारवाया करून त्यांच्या नाकीनऊ आणणारे तहसीलदार नीलेश मडके यांचा तीन दिवसांपासून पाठलाग करणारे तस्कर त्यांच्या शासकीय निवासस्थापर्यंत पोहोचले. शनिवारी त्यांच्यावर घरीच हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तहसीलदार बचावले आहेत. या प्रकरणी तीन आरोपींविरोधात मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही आरोपी पसार झालेले आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

तहसीलदार मडके अॅक्शन मोडवर

अवैध वाळू वाहतुकीला आळा बसावा म्हणून तहसीलदार नीलेश मडके काही दिवसांपासून अ‍ॅक्शन मोडवर आहेत. दररोज होणारी वाळू वाहतुकीची परवानगी तपासणी, ट्रक कोठून कुठे चालला याची चौकशी सुरू असल्यामुळे अवैधरित्या वाहतूक करणार्‍या तस्करांना वाळूची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तहसीलदार मडके यांच्या निवासस्थानासमोर काहीजण रेकी करत असल्याचे लक्षात आले. विचारपूस केली असता, तुम्ही आमच्या रेतीच्या गाड्या पोलिस स्टेशनला का लावता, म्हणत तहसीलदारांशी हुज्जत घालून दबाव आणण्याचा प्रकार समोर आला. तहसीलदार मडके एक दोन आठवड्यापासून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, तहसील कार्यालयातील स्टाफसह अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई करीत आहेत. अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारी काही वाहने पोलिस स्टेशनला लावण्यात आली असून, वाळू साठाही जप्त करण्यात आलेला आहे.

शुक्रवारी सकाळी तहसीलदार नीलेश मडके यांच्या पत्नीने फोनकरून माहिती दिली की, एक अनोळखी इसम हा आपल्या शासकीय निवासस्थानासमोर चकरा मारत आहे. त्यामुळे तहसीलदार मडके यांनी घरासमोर येवून पाहिले असता, त्यांना अनोळखी इसम घरासमोर उभा दिसला. तो नेहमी पाठलाग करणारा असल्याचे लक्षात आल्याने त्याला त्याचे नाव विचारले असता, त्याने गजानन मनोहर इंगळे असे सांगितले. तू इथे काय करतो? तू माझा दोन तीन दिवसांपासून पाठलाग करीत आहे. त्यावर तो म्हणाला, तुम्ही वाळूच्या गाड्या पोलिस स्टेशनला का लावल्या, असे म्हणून तहसीलदारांसोबत हुज्जत घातली व हल्ल्याचा प्रयत्न केला.

तसेच, तहसीलदार मडके हे आपले बोलणे आटोपून आपल्या निवासस्थानी जात असताना गेटमधून आत जाण्यास अटकाव केला. हल्ल्याचाही प्रयत्न केला. या घटनेबाबत लेखी तक्रारीवरून मेहकर पोलिस स्टेशन येथे आरोपी गजानन मनोहर इंगळे रा. माळीपेठ मेहकर, योगेश राजेंद्र काटकर व मोहन राजेंद्र काटकर राहणार मेहकर यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास मेहकरचे पोलिस निरीक्षक यांच्या आदेशाने मुख्य जमादार सुरेश काळे हे करीत आहेत. पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

सिंदखेडराजा तालुक्यातील निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रात दोन महिन्यांपूर्वी अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकातील तलाठी यशवंत घरजाळे व विष्णू थोरात हे कारवाईसाठी गेले. तेव्हा त्यांच्या अंगावर 40 ते 45 आरोपींनी ट्रॅक्टर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने महसूल प्रशासनात खळबळ उडाली होती. यातील दोन आरोपींना 25 मे रोजी किनगावराजा पोलिसांनी शिताफीने अटक केली. तर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. शेख अलीम शेख असिफ (वय 31) व विनोद शामराव खरात (वय 39) अशी आरोपींची नावे आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!