Katol Constituency : जिल्ह्यातील हायप्रोफाईल सीट मानण्यात येणाऱ्या काटोल मतदारसंघात महाविकासआघाडीचे सलील देशमुख व महायुतीचे चरणसिंग ठाकूर यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र काँग्रेस बंडखोर याज्ञवल्क्य जिचकार व शेकापचे राहुल देशमुख यांच्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मतदारांमध्ये असलेल्या नाराजीमुळे सलील देशमुख अडचणीत आल्याचे चित्र आहे.
या मतदारसंघात कुणबी, तेली आणि माळी समाजाचे वर्चस्व आहे. काटोलमध्ये 17 उमेदवार रिंगणात असून सलील देशमुख यांचे वडील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचेच नाव असलेले आणखी एक देशमुखदेखील रिंगणात आहेत. त्यांच्यामुळे फारसा काही फरक पडणार नसला तरीही नाव साधर्म्यामुळे निवडणुकीत प्रस्थापित उमेदवाराला अडचणीचा सामना करावा लागतो. यंदा निवडणुकीत अनिल देशमुख रिंगणात नाहीत. पण त्यांच्याच नावाचा उमेदवार रिंगणात असल्यामुळे आणि त्यातही राष्ट्रवादीचे घड्याळ त्यांच्याकडे असल्यामुळे जे काही नुकसान सलील यांना व्हायचे आहे, ते होणारच आहे.
2014 मध्ये काका-पुतण्याच्या लढाईत भाजपचे आशिष देशमुख यांनी राष्ट्रवादीचे नेते (काका) अनिल देशमुख यांचा पराभव केला. भाजप नेते व पारडसिंगा येथील सती अनसूया माता ट्रस्टचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांचा 2019 मध्ये अनिल देशमुख यांच्याकडून पराभव झाला. त्यांनी पाच वर्षे मतदारसंघ पिंजून काढला. आता पक्षनिष्ठेमुळे त्यांना संधी मिळाली. काटोलमध्ये दोन दशकांपासून अनिल देशमुखांचे ‘घड्याळ’ गावागावात पोहोचली आहे.
यावेळी नाम साधर्म्य असलेले अनिल शंकरराव देशमुख यांना राष्ट्रवादीने (अजित पवार गट) काटोलच्या मैदानात उतरविले आहे. सलील देशमुखांच्या मतांचे विभाजन करण्यासाठी अजित पवार गटाने ही शक्कल लढविली आहे. याचा फटका लहान गावांमध्ये सलील यांना बसण्याचा धोका आहे. वडिलांच्या राजकारणातून मोठे झालेले सलील आता यातून काय मार्ग काढतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
घरातच बदलली उमेदवारी
काटोलसाठी अनिल देशमुख यांचे नाव प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले होते. पण, आपल्याऐवजी मुलगा निवडणूक लढणार असल्याचे ऐनवेळी जाहीर करण्यात आले. पण, घरातच उमेदवारी बदलण्यामागे मोठे कारण असल्याचेही बोलले जात आहे. ‘मी अर्ज दाखल केला असता तर त्यात तांत्रिक चुका काढण्यासाठी दिल्लीतून वकील बोलावून ठेवला होता. त्यामुळे सलीलने अर्ज भरला’, असं सांगून अनिल देशमुख तर सुटले. पण, सलील यांची काटोलमधून लढण्याची आधीपासून इच्छा होती, ही बाब कशी झाकली जाणार? निवडणूक लढण्यावरून पिता-पुत्रांमध्ये घरात वाद झाल्याचीही चर्चा होती.