महाराष्ट्र

Lok Sabha Election : सक्करदारा गावाने टाकला मतदानावर बहिष्कार 

Boycott Voting : गावकरी दिवसभर फिरकले देखील नाहीत

Bhandara gondia constituency : गावातील हक्काचे मतदान केंद्र हटविल्याच्या कारणावरून तुमसर तालुक्यातील सक्करधरा आदिवासी गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. घानोड येथील मतदान केंद्राकडे मतदार दिवसभर फिरकले नाहीत. 

काल (19 एप्रिल) सकाळपासून गावात शुकशुकाट दिसून आला.एवढेच नव्हे गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष न दिल्यास बहिष्काराची भूमिका पुढील निवडणुकीतही कायम राहील, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी व्यक्त केली.

सातपुडा पर्वतरांगांच्या घनदाट जंगलात असणाऱ्या आदिवासी गावातील मतदान केंद्र दोन किमी. अंतरावरील घानोड गावात हटविण्यात आले. हे केंद्र हटविल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा यापूर्वीच गावातील मतदारांनी दिला होता. तहसीलदारांना निवेदनही दिले होते. महिनाभरापूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.

दरम्यान, मतदारांचे मन वळविण्याचे प्रयत्नही प्रशासकीय यंत्रणेकडून झाले नाही. गावात मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेत असणारे हक्काचे मतदान केंद्र शेजारच्या घानोड गावात हटविण्याच्या निर्णयानंतर गावकऱ्यांनी आधी जाहीर केल्यानुसार मतदानावर बहिष्कार घातला.

गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गावाचे प्रशासकीय कामकाज 3 किमी अंतरावरील धुटेरा गावातून होत आहे. सहा गावे मिळून धुटेरा ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली. परंतु, आदिवासीच्या हक्काच्या योजना, मूलभूत सुविधा, शासकीय योजना व अन्य योजना गावात पोहोचल्या नाहीत. गावात कधी सरपंच व सचिव गावात येत नसल्याने गावकऱ्यांना योजनांची माहिती होत नाहीत. गावात रोहयोचे कामे सुरू करण्यात येत नसल्याने गावकऱ्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे.

Lok Sabha Election : ओढून ताणून पुन्हा 54 टक्केच मतदान

ग्रामपंचायत दूर असल्याने घानोड आणि सक्करधरा अशा दोन गावांची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. परंतु, सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही, अशा अनेक तक्रारी गावकऱ्यांच्या आहेत. या मूलभूत प्रश्नांकडे असेच दुर्लक्ष राहिल्यास पुढील विधानसभा निवडणुकीतही बहिष्काराचा निर्णय राहील,अशी गावकऱ्यांनी जाहीर केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!