Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील काही विधानसभा मतदारसंघांवरून महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. काँग्रेस आणि शिवसेना एकमेकांना या जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. किडा असलेल्या मतदारसंघांपैकी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ एक आहे. या मतदारसंघात काँग्रेसला साजिद खान पठाण, डॉ. झिशान हुसेन, शफी आणि रमाकांत खेतान यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करावे लागणार आहे. अशाच काँग्रेस मधील दोन गट सध्या दोन वेगवेगळ्या नावांवर अडून बसले आहे. या दोन्ही गटातील नेता दिल्लीत प्रचंड वजन असणारे आहेत.
यापैकी एक गट साजिद खान पठाण यांच्यासाठी प्रचंड आग्रही आहे. दुसऱ्या गटाकडून झिशान हुसेन यांचे नाव मोठ्या प्रमाणावर रेटले जात आहे. ही दोन्ही नावे घेऊन महाराष्ट्रातील दोन नेते थेट राहुल गांधींपर्यंत पोहोचले आहेत. मात्र राहुल गांधी यांचा प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्यावर अधिक विश्वास असल्याने विजय कोणाचा होईल, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. काँग्रेसमध्ये ही तणातणी सुरू असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांची अकोल्यात जोरदार तयारी सुरू आहे.
हिंदुत्ववादी चेहरा
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणारच आहेत. संपूर्ण मतदारसंघात मिश्रा यांच्या नावाने जोरदार प्रचार सुरू झाला आहे. या प्रचारादरम्यान मिश्रा हे मंगळवारी (29 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काहीही झाले तरी मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा, अशी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अनेकांची इच्छा आहे. यात भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मधील अनेकांचा समावेश आहे. त्यामुळे राजेश मिश्रा यांच्यावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सातत्याने चहा त्यांचा दबाव वाढत आहे.
बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख आणि राजेश मिश्रा हे अनेकदा मुंबईत ‘मातोश्री’वर जाऊन आलेत. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून राजेश मिश्रा यांच्यासाठी चर्चेच्या बैठकीत थेट काँग्रेसशी पंगा घेतला. काँग्रेसची जागा सोडायला तयार नाही. असे असले तरी शिवसेना या जागेसाठी योग्य तो निर्णय घेईल, असे खासदार संजय राऊत यांनी ‘द लोकहित’शी बोलताना ठामपणे नमूद केले. त्यामुळे काँग्रेसने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिला तरी, राजेश मिश्रा हे देखील आपला अर्ज दाखल करतील हे निश्चित आहे.
राजेश मिश्रा यांनी माघार घेऊ नये
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेश मिश्रा यांनी माघार घेऊ नये, असा शिवसैनिकांचा प्रचंड दबाव त्यांच्यावर आहे. अशा परिस्थितीत मिश्रा यांना सध्या तरी दुहेरी कसरत करावी लागत आहे. अकोला जिल्ह्यातील स्थानिक शिवसैनिकांना ते नाराज करू शकत नाहीत. मात्र स्वतः उद्धव ठाकरे यांनी शब्द टाकल्यास मिश्रा हे ठाकरेंचा शब्दही मोडू शकत नाहीत. त्यामुळे मंगळवारी मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तरी, अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.