महाराष्ट्र

Maharashtra Election : राजकारणातील ‘खलनायक’

Sadabhau Khot : वक्तव्याने निर्माण झाली संतापाची लाट 

या लेखातील मतं लेखकाची आहेत. द लोकहित या मतांशी सहमत असेलच असे नाही.

Sharad Pawar : आई-मुलांवर चांगले संस्कार करते. कसं वागावं, कसं बोलावं, वडीलधाऱ्या व्यक्तिंचा आदर कसा ठेवावा, याबाबतचे संस्कार मुलांवर बिंबविण्याचा ती प्रयत्न करते. हेच चांगले संस्कार आपल्या जीवनाची वाट सुकर करतात. खोटं बोलू नये, सन्मार्गाने वागावे, गरजवंताला मदत करावी, कुणाची निंदा करू नये. वाईट बोलू नये, विशेष म्हणजे आपल्या बोलण्याने कुणाचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यावी याची शिकवण घरातून मिळते. प्रत्येक घरात संस्कार रुजवणारी श्यामची आई असतेच. घरी आई-वडील आणि शाळेत गुरुस्थानी असलेले शिक्षक हेच चांगले विचार मनावर कोरण्याचा प्रयत्न करतात.

सर्वांवरच लहानपणी या सद्विचारांचे सिंचन होते. वय आणि परिस्थिती बदलली तरी त्याचा विसर पडता कामा नये. काही जण हा विचार आयुष्यभर जोपासतात तर काही जण भरकटत जातात, विवेक सोडून वागतात. राजकारणात चुकीचं बोलणाऱ्यांची, वागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विवेक हरवलेली, विचारांपासून भरकटलेली ही माणसं राजकारणातील ‘खलनायक’ म्हणावी लागतील. समाजात वावरताना कसं वागावं, काय बोलावं याच भान न राखता ही मंडळी वागतांना दिसतात.

भाषेवर नियंत्रण नाही

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी या उथळ वाचाळवीरांच्या भाषेचा दर्जा घसरत चालला आहे. सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी म्हणून वावरणाऱ्या काही व्यक्तींचा मेंदू किती सडला आहे, त्यांचे विचार किती बुरसटलेले आणि नासले आहेत याची प्रचिती येते. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदा खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संदर्भात केलेले वक्तव्य असेच संतापजनक आहे. त्यांच्या शारीरिक व्यंगावर केलेली टीका तर तळपायाची आग मस्तकात नेणारी आहे.

आपल्याला समर्थन देणाऱ्यांना खुष करण्यासाठी या वाचाळवीराची जीभ सटकली आणि तो वाह्यातासारखा काही तरी बाष्कळ बोलून गेला. व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस यांच्या सारखे सुसंस्कृत नेते बसले होते. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सदा खोतांच्या बोलण्याची कुणाला खंत वाटली नाही. तेही या तमाश्यात सामिल झाले. फडणवीस यांनी खोतांना जाब विचारुन वेळीच त्यांचे कान पिळायला हवे होते. दुर्दैव असे काहीच झाले नाही. या प्रकाराने सर्वांच्या मनात संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे.

एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की मला महाराष्ट्राचा चेहरा बदलवायचा आहे. या वाक्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबतची तळमळ व्यक्त केली. सदा खोत यांनी जत येथील कार्यक्रमात शरद पवार यांना त्यांच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे, काय असे न शोभणारे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा सर्व बाजूंनी निषेध होत आहे.

अजित पवार यांनी विनाशकाले विपरीत बुद्धी, असे या वक्तव्याचे वर्णन केले. खोत यांचे वक्तव्य चुकीचे आणि निषेधार्थ आहे. अशी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सुनावले. पवार साहेबांवर एवढ्या खालच्या पातळीवर टीका करणे आपल्याला वैयक्तिकरित्या अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही असेही अजितदादा म्हणाले.‌

वक्तव्याचा समाचार

संजय राऊत यांनी तर शेलकी भाषेत सदा खोत यांचा समाचार घेतला. सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचा उल्लेख त्यांनी फडणवीस यांचे पाळलेले व अकारण भुंकणारे कुत्रे असा केला. बुद्धी गहाण ठेवणाऱ्या खोतांनी राऊत यांचा उल्लेख गटारात लोळणाऱ्या प्राण्यांशी केला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना लोकप्रतिनिधी किती खालच्या भाषेत बोलू शकतात. त्यांच्या मनात किती पराकोटीचा द्वेष आणि मत्सर भरलेला आहे, हे या विधानावरून दिसून येते.

जयंत पाटील यांनी केलेली टीका संजय राऊत यांच्यासारखी होती. शब्दाचा वापर करताना मात्र त्यांनी तारतम्य बाळगले. भाषण करण्याचे स्वातंत्र्य यांचा अर्थ प्रत्येकजण आपल्या सोईने काढताना दिसतात. काहीही बोलले तरी चालते असा ग्रह काहींनी केला आहे. चुकीचे बोलण्याचा वागण्याचा परवाना कुणाला मिळालेला नाही, हे सोईस्कर पणे विसरून नको ते बकण्याचा प्रकार वाढत आहे. अशा वाचाळ वृत्तीने संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. राजकीय नेते एकमेकांवर टीका करतात. मुद्देसूद मुद्दे मांडून ही टीका करता येते. पण त्याचे भान ही मंडळी ठेवीत नाहीत.

असंस्कृतपणाचा कळस

सदा खोत यांनी आपल्या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न दमदारपणे मांडले आहेत. राजकारणाचे पाणी लागल्याने त्यांचे विचार भरकटताना दिसतात. समर्थन देणाऱ्या नेत्यांचे लांगूलचालन करण्यात ते धन्यता मानताना दिसतात. विचारात मतभिन्नता असू शकते, हे कुणी अमान्य करणार नाही. तथापी जाहिरपणे बोलताना कसे बोलावे, कोणत्या भाषेचा उपयोग करावा याचे भान ठेवणे गरजेचे ठरते. सदा खोत यांना त्याचा विसर पडला.

विचार दारिद्र्य

शारीरिक व्यंगावर वादग्रस्त विधान करून सदा खोत यांनी आपले विचार दारिद्र्य प्रगट केले आहे. अशा वाह्यात विधानावर राजकारणात प्रतिमा आणि आदर असणाऱ्या नेत्यांनी हसणे हा तर असंस्कृतपणाचा कळस म्हणावा लागेल.

इतरांवर टीका करताना विवेक गमावता कामा नये. वाचाळवीरांनी मने दुखावणारे विधान आपल्या मुखातून बाहेर निघण्याआधी त्यावर तारतम्य ठेवून आवर घालणे आवश्यक आहे. सार्वजनिक जीवनात जगताना सभ्यतेचा वस्तुपाठ‌ जपणे आपली परंपरा आहे.

Assembly Elections : फडणवीसांपुढे गुडधेंचे नव्हे ‘नरेटिव्ह’चे आव्हान!

नायक म्हणून रहा..

पुरोगामी महाराष्ट्रात राजकारणातील अनेक नेत्यांनी आपल्या आचरणातून ही शिकवण दिली आहे. जेव्हा आपण इतरांच्या चुकांकडे बोट दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे असतात हे कुणीही विसरता कामा नये.राजकारणात खलनायक म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा नायक म्हणून प्रतिमा निर्माण करणे केव्हाही चांगले. सदा खोत यांचे वक्तव्य पाहता जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अभंग आठवतो ‘तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजारा.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!