Attracting Youth : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे प्रमाण कमी होत आहे. विशेषत: सायंकाळी भरणाऱ्या शाखांमध्ये स्वयंसेवकांची संख्या रोडावत आहे. संघाच्या प्रभात शाखांमध्ये शक्यतोवर ज्येष्ठ स्वयंसेवक असतात. सायंकाळच्या शाखांमध्ये बाल आणि किशोरवयीन स्वयंसेवकांची संख्या जात असते. मात्र अलीकडच्या काळात संघाच्या सायंकाळच्या शाखांची संख्या कमी होत आहे. कोविड महासाथीनंतर हा बदल जाणवत आहे. याशिवाय बहुतांश विद्यार्थी आता सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्यांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असतो. त्याचा परिणामही संघाच्या शाखांवर झाला आहे.
कोविड काळात मुलांचा मोबाइल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील स्क्रिनिंग टाइम वाढला. त्यामुळे मुलांवर होणाऱ्या संस्कारावर त्याचा परिणाम होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही याची चिंता आता सतावत आहे. त्यामुळे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत संघाच्या शाखांबद्दल आढावा घेणार आहे. वर्धा जिल्ह्यातून या आढाव्याला सुरुवात होणार आहे. त्यासाठीच शुक्रवारपासून (ता. 16) डॉ. भागवत दोन दिवस वर्धा येथे मुक्कामी राहणार आहेत. आपल्या मुक्कामात ते अनेक वरिष्ठ स्वयंसेवकांशी चर्चा करणार आहेत. शनिवारी (ता. 17) ऑगस्टला सकाळी देशमुख लॉन येथे डॉ. भागवत स्वयंसेवकशी चर्चा करणार आहेत.
चर्चा राहणार गोपनीय
डॉ. भागवत यांच्या वर्धा दौऱ्याच्या निमित्ताने संघाच्या गटात गोपनीयता बाळगण्यात येत आहे. केवळ निमंत्रितानाच भागवत यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहता येणार आहे. प्रसार माध्यमांसह अन्य कोणालाही प्रवेश नसेल, असे सांगण्यात आले आहे. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक हिरामण पारिसे यांच्याकडे सरसंघचालक मुक्कामी राहणार आहेत. नालवाडी परिसरात अक्षय शिंगरूप यांच्याकडे भागवत ज्येष्ठ स्वयंसेवकांशी चर्चा करतील. या बैठकीत संघाच्या शाखांमधील संख्येवर विचारमंथन होणार आहे. सुमारे चार तास येथे संवाद होणार आहे. चर्चेनंतर डॉ. भागवत वर्धेतील भगतसिंह सायंशाखेला भेट देणार आहे.
Sanjay Raut : म्हणा रामकृष्ण हरी अन् वाजवा तुतारी, मशाल आहेच बुडाला..
सायंकाळच्या शाखेत डॉ. भागवत बाल आणि युवा स्वयंसेवकांशी चर्चा करतील. गटशिक्षक व गटनायक यांच्याशी देखील भागवत संवाद साधणार आहेत. शिशु, बालकांना संस्कारीत करण्याचे काम मंदावत असल्याची खंत गेल्या अनेक दिवसांपासून ज्येष्ठ स्वयंसेवक व्यक्त करीत आहेत. संघाच्या माध्यमातून मोठ्या पदांवर जाणाऱ्या अनेकांना आता या संस्थेकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे संघटन आणखी बळकट करण्याची मागणीही होत आहे. यासंदर्भातील माहिती जाणून घेतल्यानंतर संघाकडून शाखांच्या स्वरूपात बदल करण्यात येऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे. 2025 हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे नवीन उपक्रमही संघ हाती घेणार आहे.