विश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दोन महिन्यांच्या आत दुसऱ्यांदा सरसंघचालकांनी भेट घेतली. या भेटीमुळे नव्याने चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रवीण तोगडिया यांच्यासोबत जुळवून घेण्याची तयारी सुरू केल्याचे बोलले जात आहे. सहा वर्षांपूर्वी विश्व हिंदू परिषदेतून बाहेर पडलेले प्रवीण तोगडिया यांनी नवे संघटन तयार केले. आता विश्व हिंदू परिषद,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि तोगडियांचे संघटन काही मुद्यांवर एकत्र काम करण्याची तयारी करीत आहे, असेही कळते.
विश्व हिंदू परिषदेतून बाहेर पडल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली. संघ, परिषद आणि तोगडियांच्या संघटनेला एकत्र जोडणारा हिंदुत्व हा अत्यंत महत्त्वाचा धागा आहे. सध्या बांगलादेश येथे हिंदूंच्या विरोधात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत संघाने वारंवार चिंता व्यक्त केली. विश्व हिंदू परिषदने देखील याबाबत कमालीची आक्रमक भूमिका मांडली आहे. विशेष म्हणजे प्रवीण तोगडिया यांच्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेने देखील यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
बांगलादेशसह विविध मुद्यांवर तोगडिया यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतल्याचे समजते. दोघांमध्येही सोमवारी जवळपास एक तास चर्चा झाली. यापूर्वी 13 ऑक्टोबरला देखील तोगडियांनी सरसंघचालकांची भेट घेतली होती. त्या भेटीत कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली, हे देखील कमालीचे गुपित ठेवण्यात आले होते. यंदाही बैठकीत नेमकी कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, हे स्पष्टपणे बाहेर आलेले नाही. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या भविष्यातील भूमिका आणि उपक्रमांवरूनच संघासोबतच्या बैठकीत काय ठरले, हे लक्षात येणार आहे.
संघासोबत मतभेद, पण…
प्रवीण तोगडिया जाहीरपणे मोदी सरकारच्या विरोधात भूमिका मांडायला लागले होते. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज होता. विश्व हिंदू परिषदेतील त्यांच्या बाहेर पडण्याच्या निर्णयाचे संघानेही अप्रत्यक्षरित्या स्वागतच केले होते. मात्र, दोन्ही संघटनांना एकत्र जोडणारा हिंदुत्वाचा मुद्दा महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे भविष्यात हिंदूत्वाच्या मुद्यावर एकत्र काम करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.
तोगडियांची घरवापसी?
या भेटीमागे प्रवीण तोगडिया यांच्या घरवापसीचे संकेत असल्याचेही बोलले जात आहे. प्रवीण तोगडिया विश्व हिंदू परिषदेत परत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि तोगडिया यांच्यात पूर्वी खास मैत्री होती. दोघेही गुजरातचे आहेत. एकेकाळी दोघेही एकाच स्कूटरवर फिरायचे, असेही संदर्भ आहेत. दरम्यान, तोगडिया विश्व हिंदू परिषदेत, तर मोदी भाजपमध्ये गेले. मोदी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा दोघांचे संबंध चांगले होते. पण नंतर संबंध बिघडले. पुढे मोदींना विरोध करणेच तोगडियांना महागात पडले. त्यांना विश्व हिंदू परिषदेतून बाहेर पडावे लागले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांच्यासोबत एकही कार्यकर्ता गेला नव्हता. आता तोगडियांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली आहे.