Sarsangchalak Dr. Mohan Bhagwat : ओटीटीवर असं काही दाखविलं जात आहे की ते सांगणंही अवघड आहे. बिभत्स मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून समाज बिघडवण्याचे काम होत आहे. ओटीटी आता कायद्याच्या चौकटीत येणं आवश्यक आहे, असं स्पष्ट मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात त्यांनी हे विचार मांडले.
या कार्यक्रमासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. राधाकृष्णन यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती. मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील रेशम बाग मैदानावर शस्त्रपूजन पार पडले. त्यानंतर त्यांनी देशाची सुरक्षा, एकता, अखंडता, भारताचा विकास, समाज माध्यमांवरील चित्र, मुलांवर होणारे परिणाम आदींवर कठोर मतं मांडली.
युद्धामुळे फक्त विनाश..
आपला देश पुढे जात आहे. तंत्रज्ञान विज्ञान सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे. समाजही शिक्षित होत आहे. जगात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. पर्यावरणाबद्दलचे भारताचे विचार स्वीकारायला आता सुरुवात झाली आहे. प्रगती थांबायला नको. विज्ञान आमच्या जीवनाला सोयीस्कर बनवत आहे. मात्र, मानवी स्वार्थ अहंकार आणि संघर्ष निर्माण करत आहे. इस्रायल आणि हमास यांचे युद्ध कोणत्या दिशेने जाईल, किती विनाश करेल याची चिंता आहे. युद्धाने केवळ विनाशाच्या दिशेने प्रवास होतो, असे डॉ. मोहन भागवत म्हणाले.
भारताला दाबण्याचे प्रयत्न
काही आव्हाने फक्त संघ, हिंदू समाज किंवा भारतासमोर नाहीत तर संपूर्ण जगासमोर आहेत. भारत पुढे जाऊ नये असे प्रयत्न सुरू आहेत. भारताला दाबण्याचा प्रयत्न ते करत आहे. ज्यांना भारताच्या प्रगतीने त्रास होतो, तेच अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. बांगलादेशात स्थानिक कारणांमुळे हिंसक सत्तापालट झाला. त्यादरम्यान पुन्हा एकदा हिंदू समाजातील लोकांवर अत्याचार झाले. तेथील हिंदूंनी त्या अत्याचाराचा निषेध केला. यावेळी समाज संघटित झाला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी घराबाहेर पडला. पण जोपर्यंत हा अत्याचारी मूलतत्त्ववादी स्वभाव आहे, तोपर्यंत तेथील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याक समाजाच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार राहणार आहे, असंही भागवत म्हणाले.
माध्यमांनी भान राखले पाहिजे
ओटीटी प्लॅटफॉर्म्स हा आजच्या काळातला मनोरंजनाचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे. इंग्रजी, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांमधल्या वेबसिरीज, चित्रपट, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स असा अगणित मजकूर या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून प्रदर्शित केला जातो. प्रौढांसाठीच्या मजकुराला तसं प्रमाणपत्र व सूचना देऊन प्रदर्शित केलं जातं. पण सर्वच प्रकारचा मजकूर या प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. याचसंदर्भात आज सरसंघचालक मोहन भागवत यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. समाजाची मानसिकता तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माध्यमांना चिंता करायला हवी. आपल्या कृतीतून समाजाची धारणा, भद्रता, मांगल्य कायम राखणाऱ्या मूल्यांचं पोषण व्हायला हवं. किमान या गोष्टींना धक्का लागेल असं तरी काम करायला नको”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील मजकुरावर भाष्य केलं.
कुटुंब शिक्षक मुख्यकणा
सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी कुटुंबातून व्यक्तीला मिळणारे संस्कार, शिक्षण आणि समाजातील घडामोडींचा व्यक्तीच्या मनावर होणारा परिणाम यावर भाष्य केलं. शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षण म्हणजे प्रबोधन होतं. वाचन होतं. ऐकणं होतं. पण तिथे जे शिकवलं जातं, त्याचं मूर्तीमंत उदाहरण शिक्षक-प्राध्यापक असायला हवेत. तिथून सुरुवात करायला लागेल. त्यांच्या प्रशिक्षणाचा मार्ग शोधावा लागेल, असं ते म्हणाले. पण शिक्षण महत्त्वाचं असलं, तरी वयाच्या 3 ते 12 व्या वर्षापर्यंत घरात होणाऱ्या संस्कारांमधून व्यक्तीची मनोभूमिका रुप घेते. त्या आधारावरच माणसाची आयुष्यभर वाटचाल होत असते”, असं मोहन भागवत यांनी नमूद केलं.
नागरिकांचे हक्क महत्त्वाचे
संविधानाच्या प्रस्तावनेचा प्रसार व्हावा राज्यघटनेतील संविधानाची प्रस्तावना, मार्गदर्शक तत्त्वे, नागरिकांची कर्तव्ये आणि नागरिकांचे हक्क याचा सर्वत्र प्रसार केला जावा. कुटुंबाकडून मिळालेली व्यवहाराची शिस्त, परस्पर व्यवहारातील सदभावना आणि शालीनता. सामाजिक वर्तनात देशभक्ती आणि समाजाच्या प्रती असलेली आत्मीयता. कायद्याचे व संविधानाचे निर्दोष पालन, या सर्व गोष्टी मिळून व्यक्तीचे वैयक्तिक व राष्ट्रीय चारित्र्य घडते, असेंही ते म्हणाले.