Suhas Babar : विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्या दिवशी 173 आमदारांनी शपथ घेतली. पण एका प्रसंगाने 34 वर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवंगत आर.आर. पाटील यांचे सुपूत्र रोहित पाटील आणि दिवंगत अनिल बाबर यांचे सुपूत्र सुहास बाबर या अफलातून प्रसंगाचे निमित्त ठरले. एक अप्रतिम योगायोग या निमित्ताने महाराष्ट्राने अनुभवला.
विरोधी पक्षांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला. त्याची अजूनही चर्चा सुरू आहे. पण त्यातही एका अनोख्या योगायोगाने सर्वांचे लक्ष वेधले. पंधराव्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे रोहित पाटील आणि खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत एकत्र प्रवेश घेतला. 34 वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्या पिढीच्या निमित्ताने सभागृहाला हा प्रसंग बघता आला.
सर्वांत तरुण आमदार
राज्याच्या विधानसभेत तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले रोहित पाटील सर्वांत तरुण आमदार आहेत. त्यामुळे 288 सदस्यांमध्ये 27 टक्के पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करत असलेल्या आमदारांचा समावेश आहे. 15 व्या विधानसभेत 25-45 वयोगटातील केवळ 57 आमदार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे 10 आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. काँग्रेसचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 6 आमदार निवडून आले आहेत. त्यांची मुख्य व्हिप म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 15व्या महाराष्ट्र विधानसभेत 25-45 वयोगटातील केवळ 57 आमदार आहेत. 1970 नंतर प्रथमच ही संख्या खाली आली आहे. मुंबईमधील 36 पैकी 9 आमदारांनी पहिल्याच प्रयत्नात विजय खेचून आणला आहे.
Maharashtra : बावनकुळे बरसले, ‘विरोधकांना कोणीतरी नियम शिकवा’
1990 मध्ये असेच घडले होते
दिवंगत नेते आर. आर. पाटील आणि अनिल बाबर यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तासगाव विधानसभा मतदारसंघातून आर. आर. पाटील तर, खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अनिल बाबर यांनी निवडणूक जिंकली होती. त्यानंतर दोघांनी विधानभवनामध्ये एकत्रितच प्रवेश केला होता. त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील आणि आमदार सुहास बाबर यांनी त्याच अंदाजात एकत्रित विधानभवनात प्रवेश केला. या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर, आर. आर. पाटील आणि अनिल बाबर यांची सगळ्यांना आठवण झाली. अनेकांनी सोशल मीडियावर तशा प्रतिक्रिया दिल्या. रोहित पाटील हे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आले आहेत.