बांगलादेशातील हिंदू बांधवांना त्रास होऊ नये, यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. तेथील हिंदूंची जबाबदारी भारत सरकारची आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मांडली. मात्र यासाठी देशाच्या नागरिकांचा पाठिंबा देखील आवश्यक आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात महाल परिसरातील मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वतंत्र राष्ट्र म्हणून आपण जे मार्ग निवडले आहेत, त्यावर चालताना घटनात्मक नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. मोठ्या कष्टाने, अनेकांच्या त्यागाने हे स्वातंत्र्य मिळाले आहे. ते टिकवून टेवण्याची जबाबदारी आपली आहे. ज्यांच्या कष्टाने आपण स्वातंत्र्य मिळवले ती पिढी गेली, पण येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बांगलादेशमधील हिंदू संकटात
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी 5 ऑगस्ट रोजी देश सोडल्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. बांगलादेशातील 47 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले करण्यात आले आणि मंदिरे पाडण्यात आली. एकूण 278 ठिकाणी अल्पसंख्याकांच्या संपत्तीची लूट करण्यात आली. सततच्या धमक्यांमुळे हिंदू समाजाचे लोक भारताच्या सीमेवर जमले आणि त्यांनी आश्रय घेतला. बांगलादेशातील राष्ट्रीय हिंदू महाआघाडीच्या नेतृत्वाखालील अल्पसंख्याकांना या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले, याचाही उल्लेख भागवतांनी केला.
सरकार पावले उचलणार
या परिस्थितीत आपल्या देशाची काळजी घ्यायचीच आहे. शेजारच्या राष्ट्रत अस्थिरता राहणार नाही, याची देखील काळजी घ्यावी लागेल. आणि त्याचवेळी आपल्या लोकांवर अत्याचार होऊ नये यादृष्टीने पावलेही उचलावी लागतील. भारताने कोणावर आक्रमण केले नाही. उलट अडचणीत मदत केली. आपल्यासोबत कोण कसं वागतं, हे कधीच बघितलं नाही. हीच आपली संस्कृती आहे. परिस्थिती नेहमी सारखी नसते. बदलत असते. देशातल्या सामान्य नागरिकांना देखील स्वातंत्र्याची रक्षा करावी लागेल. सामान्य नागरिक जेव्हा देशभावना घेऊन जगतो तेव्हा सरकार देखील पावलं उचलते, असेही डॉ. भागवत म्हणाले. देशाचा सीमेवर आपले जवान रक्षा करतात त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची जवाबदारी आपली आहे, असे संघचालक म्हणाले .
पहिला स्वातंत्र्य लढा म्हणजेच 1857 चा उठाव भारताच्या इतिहासात अनेक अंगांनी महत्त्वाचा आहे. या संघर्षासोबतच भारतात मध्ययुगीन काळाचा शेवट आणि नव्या युगाची म्हणजे आधुनिक कालखंडाची सुरुवात झाली होती, याचाही त्यांनी उल्लेख केला. अहिंसक सत्याग्रह ते हातात बंदूक घेऊन लढणारे देशाच्या प्रत्येक भागात स्वतंत्र नायक झाले. मोठ्या कष्टाने, अनेकांच्या सर्वस्व त्यागाने हे स्वातंत्र्य मिळाले आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.