Lok Sabha Election 2024 महायुतीमध्ये लोकसभेची उमेदवारी खासदार प्रतापराव जाधव यांना देण्याला भारतीय जनता पार्टीने विरोध दर्शविला आहे. जाधव यांच्या प्रचाराचे काम आम्ही करणार नाही, असा इशारा दोन दिवसांपूर्वी बुलढाण्यात देण्यात आला आहे. आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या मुद्द्यावरून बंड पुकारण्यात आले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला बुलढाणा लोकसभेची जागा सुटत असल्याचे कळल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामासत्र सुरू केले आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार देण्यात यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे बुलढाणा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा सादर करीत पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधले आहे. या राजकीय घडामोडीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी मागणी काय?
विदर्भातील बुलढाणा जिल्हा हा पारंपरिकरीत्या काँग्रेसक्षाचा मतदारसंघ आहे. मात्र गेल्या 15 वर्षांपासून हा मतदारसंघ आघाडीच्या माध्यमातून कधी राष्ट्रवादी काँग्रेसला तर कधी दुसऱ्या पक्षाला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना जनतेची कामे करताना अडचण जात आहे. त्यामुळे यंदा हा मतदारसंघ काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यात यावा आणि काँग्रेसचाच उमेदवार देण्यात यावा अशी मागणी आहे. याख् मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील 11 तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला.
राजकीय वर्तुळात खळबळ
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अशाप्रकारे सामूहिक राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. या राजीनामा नाट्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी तत्काळ ही घडामोड प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना फोनवरून कळविली आहे. बुलढाणा मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले होते. पण त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला साथ दिली. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर दावा केला आहे.
बुलढाणा लोकसभेची जागा महाविकास आघाडीतर्फे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या मतदारसंघात प्रा. नरेंद्र खेडेकर यांचे नाव संभावित उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब न झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आता हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार असल्याच्या शक्यतेवर नाराजी व्यक्त करीत बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उपसले आहे.
नाना पटोले यांना फोन
बुलढाणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्यात आल्याने बोंद्रे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना याबाबत अवगत केले. ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या टोकाच्या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दूरगामी परिणाम दिसणार आहे. यासर्व घडामोडीत काँग्रेसच्या राज्य सरचिटणीस अॅड. जयश्री शेळके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात बुलढाणा लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये नेमकी कोणाच्या वाट्याला येते? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.