Monsoon session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा सध्या सुरू आहे. अधिवेशनाची सांगता होण्यापूर्वी आता आरोप प्रत्यारोपांना चांगलाच जोर चढला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने महायुतीला चांगलाच घाम फोडला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील प्रमुख आणि ज्वलंत मुद्दा म्हणून मराठा आरक्षणाच्या विषयाकडे पाहिले जात आहे. त्यादृष्टीने आता विरोधकांकडून सरकारवर आगपाखड देखील सुरू आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला.
मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमीका स्पष्ट करणे अपेक्षित आहे.
जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतू सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. म्हणून आरक्षण प्रश्नावर सरकार सभागृहात बोलत नाही. खरं तर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे महायुतीने सत्तेतून बाहेर पडावे, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
वडेट्टीवार म्हणाले, सरकारने आंदोलकांना काय आश्वासन दिले हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगितले नाही. मुख्यमंत्री अधिवेशन सुरू असताना आरक्षणप्रश्नी बैठक बोलावतात. त्यापेक्षा त्यांनी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांना आम्ही वाचा फोडत आहोत. त्यामुळे गोंधळ घालून काम बंद पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
पितळ उघडे पडेल
महायुतीचे पितळ उघडे पडेल या भीतीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना बोलू दिले जात नाही. अपयश लपवण्यासाठी सरकारचा हा थयथयाट सुरू आहे. महायुतीत 200 च्यावर आमदार आहेत. तरी देखील आरक्षाचा प्रश्न महायुती सरकार सोडवत नाही. उलट सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडले जात आहे. विरोधी पक्षाला सभागृहात बोलू दिले जात नाही.